कऱ्हाड पालिकेत नव्या वर्षात शिस्तीचा पायंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST2021-01-03T04:36:34+5:302021-01-03T04:36:34+5:30
येथील पालिका स्वच्छ सर्वेक्षणात देशातील एक लाख लोकसंख्येच्या आतील पालिकांमध्ये पहिल्या क्रमांकावर आली. सलग दोनवेळा स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार पालिकेने ...

कऱ्हाड पालिकेत नव्या वर्षात शिस्तीचा पायंडा
येथील पालिका स्वच्छ सर्वेक्षणात देशातील एक लाख लोकसंख्येच्या आतील पालिकांमध्ये पहिल्या क्रमांकावर आली. सलग दोनवेळा स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार पालिकेने प्राप्त केला आहे. त्या अनुषंगाने शहरातून विविध उपक्रमांद्वारे शिस्त लावण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्याची सुरुवात पालिकेच्या कार्यालयीन कामकाजापासून करण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी ठरविले. त्यानुसार त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम सुरू केले आहे. सलग तीन शुक्रवार सायकल डे पाळण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना वेळेचे महत्त्व कळावे, यासाठी मुख्याधिकारी डाके स्वत: साडेआठ वाजल्यापासून पालिकेत असतात. अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साडेनऊ वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित राहावे, अशा सूचना त्यांनी वेळोवेळी केल्या आहेत. मात्र, तरीही काहीजण कार्यालयीन वेळा पाळत नाहीत. अखेर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पालिकेत नवीन पायंडा पाडण्यासाठी मुख्याधिकारी डाके यांनी नवीन कल्पना लढवली. त्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उशिरा येणाऱ्यां कर्मचाऱ्यांचे बँजोच्या गजरात स्वागत केले. साडेनऊ वाजल्यानंतर आलेल्या ५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी प्रशांत कांबळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच हारतुरे घालून स्वागत केले.
- चौकट
अधिकारी, कर्मचारी झाले खजील
पालिकेत उशिरा आल्यानंतर धावतपळत आपल्या टेबलपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेले अधिकारी, कर्मचारी प्रवेशद्वारातच थबकले. त्याठिकाणी मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच बँजोही तयारीत होता. लेटलतिफ कर्मचारी प्रवेशद्वारात येताच बँजो सुरू व्हायचा आणि अधिकारी संबंधिताला हार घालायचे. या उपक्रमामुळे उशिरा आलेले अधिकारी, कर्मचारी पुरते खजील झाल्याचे पाहायला मिळाले.
फोटो : ०२केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड पालिकेत शुक्रवारी कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वाजत-गाजत आणि हारतुरे देऊन स्वागत करण्यात आले.