Satara Politics: नितीन पाटील यांची प्रभाकर घार्गे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:59 IST2025-09-20T18:56:00+5:302025-09-20T18:59:02+5:30
दसऱ्यापर्यंत सीमोल्लंघन निर्णय..

Satara Politics: नितीन पाटील यांची प्रभाकर घार्गे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर
रशिद शेख
खटाव : माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी विधानसभा निवडणुक झाल्यानंतरही कोणतीच राजकीय भूमिका घेतली नाही. त्यांनी लवकरात लवकर राजकीय भूमिका जाहीर करावी व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार) प्रवेशचा निर्णय घ्यावा, अशी खुली ऑफर खासदार नितीन पाटील यांनी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना जाहीर कार्यक्रमात दिली. त्याची चांगली चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पळशी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मनोज घोरपडे, डॉ. विवेक भोइटे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रदीप विधाते,अर्जुन खाडे, जिल्हा बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, संभाजीराव फडतरे, सदाशिव खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन पाटील म्हणाले, प्रभाकर घार्गे यांनी गेली ३० वर्षे समाजकारण व राजकारणात काम केले. आपले शिव, शाहू, फुले व आंबेडकर विचारधारा कोणाकडे आहे याचा विचार करून लवकर उपमुख्यमंत्री अजितदादा गटात प्रवेशाचा निर्णय घ्यावा. त्याला उपस्थित शेतकरी व कार्यकर्त्यांनीही दाद दिली.
दसऱ्यापर्यंत सीमोल्लंघन निर्णय...
नितीन पाटील यांनी भाषणातून दिलेल्या पक्षप्रवेशाच्या आवतणाचा मुद्दा पकडून प्रभाकर घार्गे म्हणाले, दूध भाजले म्हणून ताकही फुकून पिणार आहे. या तालुक्याची बांधणी नव्या जोमाने करणार आहे. मी आजपर्यंत खटाव तालुक्यातील अनेकांना वेगवेगळ्या पदावर संधी दिली आहे. त्यापैकी बऱ्याच जणांना वाटले की ते मोठे झाले. त्यामुळे पूर्ण विचार करून तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन यापेक्षा मोठा कार्यक्रम दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर घेऊ, असे म्हणत त्यांनी सीमोल्लंघनासाठी सबुरी दाखविली.