...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 23:34 IST2025-11-06T23:33:32+5:302025-11-06T23:34:42+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काम करण्याची संधी पक्षाने मला दिली. पक्षाप्रति मीही प्रामाणिक राहत आजवर निरपेक्ष भावनेने काम पाहिले, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
-प्रमोद सुकरे, कराड
गेल्या अनेक दिवसापासून तळ्यात -मळ्यात असणाऱे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय, कराड तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष, मलकापूचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी गुरूवारी (६ नोव्हेंबर) रोजी आपल्या काँग्रेस सदसत्वाचा राजीनामा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष रणजीत देशमुख यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे बरेच दिवस रखडलेला त्यांचा भाजप प्रवेश आता निश्चित मानला जात आहे.
त्यांनी पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, 'मी आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे वेळोवेळी पार पाडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काम करण्याची संधी पक्षाने मला दिली. पक्षाप्रति मीही प्रामाणिक राहत आजवर निरपेक्ष भावनेने काम पाहिले.'
'माझे वडील स्वातंत्र्यसैनिक दिवंगत भास्करराव शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत आनंदराव चव्हाण आणि प्रेमलाताई चव्हाण यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली सार्वजनिक जीवनात काम केले. पक्षाने त्यांना नवी ओळख निर्माण करुन दिली. याच पक्षाच्या माध्यमातून मिळालेली सत्ता हे समाजसेवेचे साधन मानून मलकापूर सारख्या ठिकाणी काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मलकापूर 24 तास मीटरने नळ पाणीपुरवठा योजना राबवून राज्यातच नव्हे; तर देशात मलकापूरची ओळख निर्माण केली', असे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
'माझ्या वडिलांच्या पश्चात त्यांच्या विधायक आणि राजकीय कार्याचा वारसा म्हणून मी काम करण्याचा आजवर प्रामाणिक प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जीवनात-राजकारणात मार्गक्रमण करत असताना मलकापूरसारख्या निमशहरी भागात विविध विकास कामे करीत असताना नागरिकांच्या हिताचे काही अभिनव विकास उपक्रम राबवले. ते केवळ राज्यातच नव्हे; तर देशातही मानदंड ठरले. मी या नेतृत्वाप्रति सदैव कृतज्ञ असेन. सध्याच्या काही अपरिहार्य परिस्थितीमुळे मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे', असे सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे.