कऱ्हाड : येथील पालिकेत नगररचना विभागाच्या कार्यालयात बांधकाम परवानगी व तक्रार अर्जाबाबत कार्यवाहीवरून नगररचना सहायक व बांधकाम ठेकेदारामध्ये मारामारी झाली. मंगळवारी ही घटना घडली.याप्रकरणी पालिका नगररचना सहायक सचिन संभाजी पवार (रा. हजारमाची) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षद दत्तात्रय बदामी (वय ३७, रा. सोमवार पेठ, कऱ्हाड) यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हर्षद बदामी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सचिन पवार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड पालिकेचे नगररचना सहायक सचिन पवार आणि दिनकर गायकवाड हे नगररचना विभागात काम करत असताना सकाळी अकराच्या सुमारास हर्षद बदामी तेथे गेले. बांधकाम फाईल व तक्रार अर्जाचे काय झाले? अशी त्यांनी विचारणा केली. त्यावर पवार यांनी तक्रार अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. बांधकाम फाइलवर वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवून कार्यवाही करण्यात येत आहे, असे सांगितले.त्यावर बदामी त्यांच्याशी हुज्जत घालू लागले. अभिलेखाचे छायाचित्र काढण्यासाठी रीतसर मागणी अर्ज करा, असेही पवार यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर वाद वाढू नये, यासाठी पवार हे मुख्याधिकारी दालनाकडे निघाले असता, बदामींनी शिवीगाळ करत त्यांना मागे ढकलले. अन्य एक कर्मचारी बदामींना बाहेर व्हरांड्यात घेऊन गेला. तेथेही पवार यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. हातातील हेल्मेट मारण्यासाठी उगारले. तेथील कर्मचाऱ्यांनी बदामीला बाजूला नेले. त्यानंतर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना घडलेला प्रकार सांगून सचिन पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. शहर पोलिसांनी याप्रकरणी हर्षद बदामी याच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणे व अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.हर्षद बदामी यांनी सचिन पवार यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. अर्जाच्या पाठपुराव्यासाठी नगररचना विभागात गेलो होतो. त्यावेळी सचिन पवार यांनी माझ्या कार्यालयात यायचे नाही. तक्रार अर्जाचा फोटो घ्यायचा नाही, असे म्हणत मला ढकलून देत मारहाण व शिवीगाळ केल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलनमारहाणीच्या घटनेमुळे येथील पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी तत्काळ कामबंद आंदोलन करत शहर पोलिस ठाणे गाठले. दुपारनंतर कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांनी पालिकेसमोर ठाण मांडून या घटनेचा निषेध व्यक्त करत कामबंद आंदोलन केले.