Satara: साप, मगर बिबट्याची भिती; सांगा, कऱ्हाडकरांनी फिरायला जायचं कुठं?
By प्रमोद सुकरे | Updated: July 16, 2025 15:58 IST2025-07-16T15:57:43+5:302025-07-16T15:58:07+5:30
रस्त्यावर वाढला मोकाट कुत्र्यांचा उपद्रव

Satara: साप, मगर बिबट्याची भिती; सांगा, कऱ्हाडकरांनी फिरायला जायचं कुठं?
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : ‘आरोग्यम् धनसंपदा’ असं म्हटलं जातं. कऱ्हाडकर त्याबाबत भलतेच जागरूक आहेत. म्हणून दररोज सकाळी ते व्यायामासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. सध्या त्यांना व्यायामाला नक्की जायचं तरी कुठं, असा प्रश्न पडत आहे. कारण प्रीतिसंगम बागेत साप, कृष्णा-कोयना नदीत मगर आणि रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव त्यांची डोकेदुखी ठरत आहे. यावर नेमका उपाय कोण अन् कसा काढणार, हा खरा प्रश्न आहे.
कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमावर वसलेल्या कऱ्हाडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी मोठी बाग आहे. ज्येष्ठ नागरिक येथे चालण्याचा व्यायाम करण्यासाठी येतात. योग, प्राणायाम करणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. येथे विषारी सापांचा वावर वाढला आहे. जवळपास वीसपेक्षा जास्त विषारी साप सर्पमित्रांनी पकडले आहेत. त्यामुळे काही दिवस ही बाग बंद केली होती.
कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर दररोज सकाळी पोहण्यासाठी येणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. मात्र दोन दिवसांपूर्वीच या कोयना नदीपात्रात मगरीचे दर्शन झाल्याने येणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली आहे. आता वनविभागानेही नागरिकांना मगरीपासून सावध राहावा, असे सांगत सोपस्कार पूर्ण केले. त्यामुळे पोहणाऱ्यांनी कुठे जायचं हा देखील प्रश्न आहेच.
सकाळच्या सत्रात फिरण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडतात. पण रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. ही कुत्री व्यायामासाठी आलेल्या लोकांवर हल्ले करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून व्यायामासाठी फिरणे देखील आता सुरक्षित राहिलेले नाही. मग चालायला जायचं तर कुठं?
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
प्रीतिसंगम बागेत यापूर्वी मोठ्या प्रमाणात साप पकडल्याचे ऐकिवात नाही. मग आत्ताच असे का घडले? तेव्हा नगरपालिका प्रशासनाने येथील स्वच्छतेकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष हेच कारण कऱ्हाडकर सांगतात. पालिकेत सध्या लोकप्रतिनिधी नाहीत. तर अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवर नीट पकड नाही.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार?
शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर भलताच वाढला आहे. ही कुत्री अनेकदा नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा बंदोबस्त कोण करणार?
तेथे बिबट्याची भीती..
शहरातील बरीचसे लोक दररोज सदाशिवगड व आगाशिव डोंगरावर फिरण्यासाठी जातात. पण त्या ठिकाणी देखील बिबट्याचा वावर असल्याने भीती आहेच.
स्टेडियमचे काम सुरू झाल्यावर ..
शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सध्या अनेकजण व्यायामासाठी जातात. पण या जागेवर आता नवीन स्टेडियम होणार आहे. लवकरच त्याचे काम सुरू होईल. मग तेथे देखील व्यायाम करता येणार नाही.