गणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:57 IST2019-09-02T15:56:30+5:302019-09-02T15:57:26+5:30
गणेश मूर्तीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून हणमंत मुगुटराव साबळे (वय ५५, रा. साबळेवाडी, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला.

गणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
सातारा : गणेश मूर्तीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून हणमंत मुगुटराव साबळे (वय ५५, रा. साबळेवाडी, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशाच्या आगमनाची सध्या घरा-घरात जय्यत तयारी सुरू आहे. साबळेवाडीतील हणमंत साबळे हे सुद्धा आपल्या घरात शनिवारी रात्री गणेश मूर्तीसाठी सजावट करत होते.
यावेळी अचानक त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते बेशुद्ध पडले असावेत, असे समजून घरातल्यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना तपासले असता ते मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ऐन गणेशोत्सवाच्या आगमनात साबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हणमंत साबळे हे शेती करत होते, असे पोलिसांनी सांगितले.