Satara: पाचगणी नगरपालिका निवडणुकीनंतर निकालासाठी जादूटोणा अन् अंधश्रद्धेचे प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:53 IST2025-12-10T13:52:43+5:302025-12-10T13:53:58+5:30
विजयासाठी उमेदवारांकडून अनिष्ट प्रथांना खतपाणी : नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त

Satara: पाचगणी नगरपालिका निवडणुकीनंतर निकालासाठी जादूटोणा अन् अंधश्रद्धेचे प्रयोग
पाचगणी (सातारा) : आपण कितीही आधुनिकतेची गाथा गायली, तरी बुरसटलेल्या विचारधारा अजूनही आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या आहेत, याचा प्रत्यय पाचगणी नगरपालिका निवडणुकीनंतर येऊ लागला आहे. विकासाचे आणि प्रगतीचे गोडवे गाणारे काही उमेदवार विजयाच्या हव्यासापोटी जादूटोणा अन् अंधश्रद्धेच्या अनिष्ट प्रथांना खतपाणी घालत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले.
पाचगणी नगरपालिका निवडणुकीचा बार वाजल्यानंतर आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे. निवडणुकीदरम्यान अनेक उमेदवारांनी 'दैवी' मदतीसाठी धाव घेतली आहे. स्मशानभूमीत गुप्त पूजापाठ करणे, ताईत-गंडे बांधणे, अघोरी विधी आणि जत्रा-जोगव्यासारख्या अंधश्रद्धांवर अवलंबून राहण्याचे प्रकार वाढले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे उमेदवार अचानक अंधश्रद्धा आणि जादूटोण्यात गुंतल्याचे पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
नागरिकांमध्ये नाराजीचे सूर..
मतांच्या राजकारणात ढोंग आणि अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याच्या या स्पर्धेमुळे निवडणुकीचा स्तर खालावल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. विकासाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून पळ काढून अंधश्रद्धेकडे लागलेला हा कल शहराच्या प्रगतशील प्रतिमेला मोठा धक्का देणारा ठरू शकतो अशी टीका सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.
गुप्त यज्ञ आणि पूजाविधी..
मतदारांना विकासाची ग्वाही देताना एकीकडे आधुनिकतेचे ढोल बडवले जात आहेत, तर दुसरीकडे पाठीमागे शुभ मुहूर्त, गुप्त यज्ञ आणि विशेष पूजाविधी यांची मागणी वाढलेली आहे. काही उमेदवार तर सकाळ-संध्याकाळ ठराविक विधी करूनच बाहेर पडत असल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक संस्कृतीला डाग
वैज्ञानिक दृष्टिकोनास प्रोत्साहन देणाऱ्या पिढीसमोर उमेदवारांकडून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार निवडणूक संस्कृतीला काळा डाग ठरत आहे. प्रचाराच्या धगधगीत आधुनिकतेची भाषा बोलणाऱ्या उमेदवारांना अचानक दैवी पाठबळ मिळावे म्हणून अनिष्ट प्रथांचा अवलंब करावा लागतोय का? असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे. निवडणुकीच्या या रेलचेलीत अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत असून, विकासाऐवजी जादूटोण्याच्या आधाराने विजय मिळवण्याच्या या प्रवृत्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.