उदयनराजेंसह वारसांना सरंजाम जमीन महसुलात सूट, राज्य शासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:36 IST2025-01-10T14:36:17+5:302025-01-10T14:36:42+5:30
सवलत तहहयात सुरू ठेवण्यास मान्यता

उदयनराजेंसह वारसांना सरंजाम जमीन महसुलात सूट, राज्य शासनाचा निर्णय
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्यसाधारण महत्त्व विचारात घेऊन भोसले कुटुंबीयांची उपजीविका त्यांच्या दर्जानुसार होण्यासाठी घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना शासनाने महसुलात सूट दिलेली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या लिनीयल वारसांना (रक्ताच्या वारसांना) संबंधित सूट तहहयात सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. जमीन, महसूल करातून ही सूट मिळाली आहे. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या या शासन निर्णयात म्हटले आहेकी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे महत्त्व लक्षात घेऊन घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तासंदर्भात वेळोवेळी शासन आदेश काढून सूट देण्यात आलेली आहे.
प्रथम १९५३ मध्ये कॅप्टन श्रीमंत शाहू प्रतापसिंह भोसले यांना अशी सूट देण्यात आली होती. त्यांच्या निधनानंतर मुलगा श्रीमंत प्रतापसिंह महाराज शाहू महाराज भोसले यांना १९५७ च्या शासन निर्णयानुसार सूट देण्यात आली. त्यानंतर १९८० च्या शासन निर्णयानुसार ही सूट उदयनराजे भोसले यांना देण्यात आली होती. आताच्या ९ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार खासदार उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या लिनीयल वारसांना तहहयात सूट चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.