आठवड्यानंतरही साताऱ्यात कांद्याला मिळतोय क्विंटलला चार हजारांचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 13:30 IST2021-02-18T13:26:16+5:302021-02-18T13:30:51+5:30
onion Satara News-सातारा बाजार समितीत आठवड्यानंतरही कांद्याचा दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तर मंडईबरोबरच इतर ठिकाणी कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये किलोने होत आहे. कांद्याचा दर वाढल्याने सामान्यांना मात्र झळ बसत आहे.

आठवड्यानंतरही साताऱ्यात कांद्याला मिळतोय क्विंटलला चार हजारांचा दर
सातारा : सातारा बाजार समितीत आठवड्यानंतरही कांद्याचा दर टिकून आहे. क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तर मंडईबरोबरच इतर ठिकाणी कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये किलोने होत आहे. कांद्याचा दर वाढल्याने सामान्यांना मात्र झळ बसत आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. सातारा, जावळी, कोरेगाव, खटाव, माण, वाई, फलटण या तालुक्यातून भाजीपाला व इतर माल येत असतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. दर गुरूवार आणि रविवारी मालाची अधिक आवक राहते.
सातारा बाजार समितीत तीन महिन्यापूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर साडे सहा हजारांपर्यंत पोहोचला होता. तर भाजी मंडई, दुकानात कांद्याची किरकोळ विक्री ७० ते ८० रुपये किलोने होत होती. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. पण, त्यानंतर कांद्याचा दर हळू-हळू कमी झाला. असे असतानाच दीड महिन्यापूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याची घोषणा केली. त्यानंतर दरात सुधारणा झाली.
सातारा बाजार समितीत जवळपास एक महिन्यापासून कांद्याला १ हजारापासून ३ हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळत होता. मात्र, त्यानंतर दरात सुधारणा झाली. ३२००, ३३०० तर काहीवेळा ३८०० रुपये क्विंटलर्यंत भाव आला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकºयांसाठी अच्छे दिन आले. असे असतानाच मागील आठवड्यापासून कांद्याचा दर ४ हजारांपर्यंत टिकून आहे. गुरूवारी ३८९ क्विंटलची आवक झाली तर क्विंटलला ४ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. एक नंबर कांद्याला ३ ते ४ आणि दोन नंबरच्या कांद्याला २ ते ३ हजारापर्यंत दर मिळाला. यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सातारा बाजार समितीत गुरूवारी ५६ वाहनांतून ५२२ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. आवक चांगली असलीतरी अजुनही अनेक भाज्यांना चांगला दर मिळत नाही. गवारचा दर तेजीत निघाला. गवारला १० किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. तसेच शेवगा शेंगला ३०० ते ४०० भाव आला. वांग्याला १० किलोला १०० ते २०० रुपये दर मिळाला. वांग्याचा भाव कमी झाल्याचे दिसून आले. टोमॅटो ५० ते ८०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजुनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० अन् दोडक्याला २५० ते ३०० रुपये दर आला.
बटाट्याला क्विंटलला ७०० पासून १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला २ ते ३ हजार रुपये भाव आला. आल्याला १ हजार १८०० रुपये दर मिळाला. लसणाला क्विंटलला ३ ते ७ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजुनही स्वस्त आहे. ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला. वाटाण्याचा भाव वाढत असल्याचे दिसून आले.
पालेभाज्यांना भाव आला कमी...
सातारा बाजार समितीत पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. पण, दरात सतत चढ-उतार सुरू आहे. गुरूवारी तर दर कमी झाला. मेथीच्या १५०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची १७०० पेंडी आली. याला शेकडा दर अवघा ३०० ते ४०० रुपयांदरम्यान मिळाला. पालकला शेकडा ४०० ते ५०० रुपये भाव आला.