पावसाळा सुरू होऊनही १४ गावे अन् २६ वाड्या तहानलेल्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:56+5:302021-06-16T04:50:56+5:30
सातारा : जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊनही अद्याप मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे ४ तालुक्यांत अजूनही टंचाई आहे. सध्यस्थितीत ...

पावसाळा सुरू होऊनही १४ गावे अन् २६ वाड्या तहानलेल्या...
सातारा : जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊनही अद्याप मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे ४ तालुक्यांत अजूनही टंचाई आहे. सध्यस्थितीत १४ गावे आणि २६ वाड्या तहानलेल्या आहेत. या तालुक्यांत ११ टँकर सुरू असून १३ हजार नागरिकांना आधार मिळाला आहे.
जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यांत डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे. पण, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदललंय. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटरकप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांत जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.
जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहिली. याबाबत जिल्हा प्रशासनानेही संभाव्य टंचाई आराखडा तयार केला होता. त्यानुसार ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते असा अंदाज होता. तर यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याची स्थिती होती. त्यासाठी ४६ टँकर लागू शकतात, असे अनुमान होते. जवळपास अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, उन्हाळा संपला तरी मोठ्या प्रमाणात टँकर लागले नाहीत.
जिल्ह्यात सध्या पावसाळा सुरू झाला आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस होत आहे. काही भागांत पावसाने चांगली हजेरी लावली, तर काही भागांत पाऊसच झालेला नाही. त्यामुळे टंचाई कमी झाली असली तरी टँकरग्रस्त गावे अजूनही आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात १४ गावे आणि २६ वाड्यांसाठी ११ टँकर सुरू आहेत. यामध्ये ९ शासकीय आणि २ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या टँकरवर १३१५४ नागरिक आणि ३०२३ पशुधन अवलंबून आहे. यामध्ये माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे.
जिल्ह्यात सध्या माण तालुक्यात ७ गावे आणि १४ वाड्यांसाठी ४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर ५७१३ नागरिक अवलंबून आहेत. खटाव तालुक्यातील २ गावे व एका वाडीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. तर वाई तालुक्यात ३ गावे आणि ५ वाड्या तहानलेल्या आहेत. वाईत ३६२६ नागरिक आणि १४८० पशुधन टँकरवर अवलंबून आहे. सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यांतील २ गावे व ४ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
चौकट :
१९ विहिरींचे अधिग्रहण...
जिल्ह्यात टंचाई असणाऱ्या गाव परिसरातील १९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्यात ३, खटावमध्ये ७, फलटण २, खंडाळा तालुक्यात १ तर वाई तालुक्यात ५ आणि सातारा तालुक्यात एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.
...........
२० दिवसांपूर्वी २१ गावे तहानलेली...
जिल्ह्यात २० दिवसांपूर्वी २१ गावे आणि २८ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर १८ हजार नागरिक आणि ५ हजारांवर पशुधन अवलंबून होते. मात्र, मागील १५ दिवसांत काही भागांत पाऊस झाल्याने टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे.
..................................................................