पर्यावरण संवर्धनाभिमुख आराखडा सादर, नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:13 IST2025-01-21T13:12:54+5:302025-01-21T13:13:24+5:30
महाबळेश्वर : सातारा प्रादेशिक योजनेतील नियोजन आणि विकासासाठीच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार नवीन महाबळेश्वर या क्षेत्रासाठी पर्यावरण संवर्धनाभिमुख पर्यटन व सर्व ...

पर्यावरण संवर्धनाभिमुख आराखडा सादर, नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा
महाबळेश्वर : सातारा प्रादेशिक योजनेतील नियोजन आणि विकासासाठीच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार नवीन महाबळेश्वर या क्षेत्रासाठी पर्यावरण संवर्धनाभिमुख पर्यटन व सर्व समावेशक विकास योजना तयार करण्यात आली आहे. या आराखड्याचे सादरीकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अधिकारी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय दरे (ता.महाबळेश्वर) दौऱ्यावर आले आहेत. या निमित्ताने त्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, सर्व सातारा जिल्हा हा पर्यटन जिल्हा करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे सांगितले. सातारा, जावळी, महाबळेश्वर आणि पाटण या चार तालुक्यांतील २३५ गावांचा नवीन महाबळेश्वर प्रकल्पात समावेश आहे. पर्यटन वाढीसह समाविष्ट गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक पर्याय यात समाविष्ट केले आहेत, तसेच या प्रकल्पामुळे १,१५३ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या जैवविविधतेच्या पर्यावरण संवर्धनासह संरक्षित आणि शाश्वत विकास होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्ते विकास महामंडळाने संविधानिक प्रक्रियेचा अवलंब करून, केंद्र व राज्य शासनाने पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र, कोयना वन्यजीव अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, संवर्धन क्षेत्र, हेरिटेज क्षेत्र या क्षेत्रांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, अशा प्रकारचे सादरीकरण केले आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा सह्याद्रीसह कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाशी एकरूप असून, उत्तरेस थेट तापोळा, कांदाट व सोळशी खोऱ्यापासून ते दक्षिणेकडील कोयना धरण भिंत, हेळवाक, मराठवाडी वाल्मीकी पठारापर्यंत स्थित आहे. नव्याने काही गावांचा समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे सर्व शक्यतांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
चार भागात विभाजन
प्रारूप विकास योजनेनुसार, हे संपूर्ण क्षेत्र चार नियोजन विभागांत विभाजित केलेले आहे. उत्तरेकडील महाबळेश्वर, उत्तर पश्चिमस्थित जावळी, पूर्वस्थित सातारा, तर दक्षिणेकडील पाटण असे चार भाग असणार आहेत.