मदत देऊन अभियंता दिन साजरा
By Admin | Updated: September 15, 2014 23:21 IST2014-09-15T22:03:17+5:302014-09-15T23:21:58+5:30
यापुढील काळातही बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केले जाईल.

मदत देऊन अभियंता दिन साजरा
सातारा : बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने अभियंता दिनानिमित्त मुकबधिर विद्यालय आणि मातोश्री वृध्दाश्रमाला मदत करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमच्या प्रारंभी भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्य यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर घार्गे, सचिव अभिजीत पाटील, व्हाईस चेअरमन सचिन देशमुख, खजिनदार संतोष जगताप, पदाधिकारी, कार्यकारिणी व सर्व सदस्य मोठया संख्येन उपस्थित होते.बांधकाम हा व्यवसाय समाजाशी सर्वात निगडीचा असल्यामुळे समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दात्त हेतूने अभियंता दिना निमित्त समाजातील अनेक गोरगरीब, गरजू विद्यार्थी, सामाजिक संस्था यांना बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने सढळ मदतीचा हात देण्यात येतो.अभियंता दिनाचे औचित्य साधून रिमांड होम मधील बालकांना बिल्डर्स असोसिएशनची सातारा शाखा मदत करत असते. यावर्षी अभियंता दिनाचे औचित्य साधून बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुकबधीर विद्यालयाच्या वर्गांना दरवाजे देण्यात आले. याबरोबरच महागांव येथील मातोश्री वृध्दाश्रमाला गहू, साखर, डाळी, तेल व अन्य साहित्य देण्यात आले. यावेळी बोलताना बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास जगताप म्हणाले, ‘बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून आज पर्यंत आम्ही अनेक सामाजिक, सांस्कृतिक , समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. यामध्ये दरवर्षी रिमांड होम मधील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात मदत दिली जाते.’
यावर्षी मुकबधीर विद्यालयाच्या शाळेच्या खोल्यांना दरवाजे देण्यात आले. यापुढील काळातही बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केले जाईल. यावेळी झालेल्या कार्यक्रमात समता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी बिल्डर्स असोसिएशनने दिलेल्या मदतीबद्दल आभार मानले. (प्रतिनिधी)