Eleven of the twelve villages wandered for water, providing twenty-four hours of electricity | बारापैकी अकरा गावांची पाण्यासाठी भटकंती.., चोवीस तास वीजपुरवठा
बारापैकी अकरा गावांची पाण्यासाठी भटकंती.., चोवीस तास वीजपुरवठा

ठळक मुद्देयेरळवाडी तलावात शंभर टक्के पाणीसाठाप्रादेशिक नळपाणी योजनेला नवसंजीवनीची गरज

संदीप कुंभार 

मायणी : राज्यातील पहिली प्रादेशिक नळपाणी योजना म्हणून बहुमान मिळवलेली खातवळसह बारा गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला चोवीस तास वीजपुरवठा व येरळवाडी तलावात शंभर टक्के पाणी असून, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या बारा गावांपैकी अकरा गावांना पाण्यासाठी आजही भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनेला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे.

येरळवाडी तलावातून खातवळसह बारा गावांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी खातवळसह बारा गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. या योजनेस पूर्वी चोवीस तास वीजपुरवठा नव्हता. तलाव्यामध्ये पुरेसा पाण्यासाठा नव्हता, तसेच योजनेची विद्युत मोटार जळाल्यानंतर खर्च कोणी करायचा, अशासह पाईपलाईन दुरुती अशा विविध कारणांनी ही योजना सतत अडचणीत सापडत होती.

त्यामुळे या योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांना ही योजना हळूहळू खर्चामुळे आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने अनेक गावांनी खर्च देणे बंद केले. त्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून बारा गावांपैकी एनकूळ गाव वगळून सर्व गावांना या योजनेतून पाणी पूर्ण बंद आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यामध्ये या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.

सध्या या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून चोवीस तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे येरळवाडी तलावामध्ये शंभर टक्के पाणीसाठा आहे. मात्र, या योजनेवर अवलंबून असणाºया गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेस नवसंजीवनी देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून येत आहेत.

पाईपलाईन झाली खराब

बनपुरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहे. फक्त या योजनेतून ज्या बारा गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता, ती पाईपलाईन अनेक दिवस योजना बंद असल्यामुळे खराब झाली आहे. ती बदलल्यास सर्व गावांना पाणीपुरवठा होईल व पाण्यासाठीची भटकंती थांबेल.

गेली सहा-सात वर्षे ही योजना बंद आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनही वारंवार वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. उन्हाळ्याततर टँकरशिवाय पर्याय नसतो. म्हणून आम्ही गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून प्रस्ताव पाठवला असून, यास मंजुरीही मिळालेली आहे.
- राज हांगे,
सरपंच, दातेवाडी

Web Title:  Eleven of the twelve villages wandered for water, providing twenty-four hours of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.