अस्वलाच्या हल्ल्यात सांडवलीतील वृद्ध गंभीर जखमी, परिसरात भितीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:21 IST2022-02-24T15:21:12+5:302022-02-24T15:21:29+5:30
अस्वलाने थेट गळ्यावर हल्ला केल्याने मोठा रक्तस्राव झाला

अस्वलाच्या हल्ल्यात सांडवलीतील वृद्ध गंभीर जखमी, परिसरात भितीचे वातावरण
परळी : अस्वलाच्या हल्ल्यात परळी खोऱ्यातील सांडवलीसारख्या दुर्गम भागात वास्तव्यास असलेले एक वृद्ध गंभीर जखमी झाले. सीताराम सखाराम मोरे (वय ६५) असे या जखमी वृद्धाचे नाव आहे. आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमी मोरे यांना उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परळी खोरे तसा वनसंपदेने संपन्न असा भाग येथे वन्य प्राण्यांचा वावर ही तितकाच पाहायला मिळतो. पण अलीकडे काही हिंस्र प्राण्यांचा वावरही वाढला आहे. त्यातच सांडवली येथील सीताराम मोरे हे वृद्ध गुरुवारी सकाळी ६.२० च्या दरम्यान ‘झऱ्याचे वावर’ या शिवारात माकडे हुसकावण्यात गेले असता तेथून परत येत असताना अचानकच अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.
अस्वलाने हल्ला करताच मोरे यांनी आरडाओरडा केला. त्यावेळेस ग्रामस्थांची चाहूल लागताच अस्वलाने तेथून धूम ठोकली; मात्र अस्वलाने थेट गळ्यावर हल्ला केल्याने मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ही घटना समजताच वनक्षेत्रपाल वन्यजीव बामनोलीचे बी. डी. हसबनीस, वनपाल डी. एम. जानकर, वनरक्षक ए. पी. माने, सरपंच गणेश चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.