सम्राट निकमच्या खूनप्रकरणी आठजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:10 IST2019-01-16T16:09:30+5:302019-01-16T16:10:35+5:30
कोडोलीतील हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम (वय २८) याचा खून केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. हा खून पेट्रोल पंप आणि हॉटेलमधील हिस्सा दिला नसल्याच्या कारणावरून झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे.

सम्राट निकमच्या खूनप्रकरणी आठजणांना अटक
सातारा : कोडोलीतील हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम (वय २८) याचा खून केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. हा खून पेट्रोल पंप आणि हॉटेलमधील हिस्सा दिला नसल्याच्या कारणावरून झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे.
मयूर राजेंद्र जाधव, बाळकृष्ण जाधव, शशिकांत जाधव, विजय दिनकर जाधव, बाळासाहेब तांगडे (सर्व रा. कोडोली, सातारा), सौरभ खरात ऊर्फ कुक्या, धीरज शेळके, संग्राम दणाणे (सर्व रा. मल्हार पेठ, सातारा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
मंगळवारी दुपारी दुचाकीवरून घरी जात असताना सम्राट चौकामध्ये दबा धरून बसलेल्या वरील युवकांनी हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम याच्यावर अचानक हॉकी स्टिक आणि सत्तूरने वार केले. यात सम्राटचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी धरपकड करून आठजणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणातील तीन ते चारजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुना वाद आणि हॉटेल व पेट्रोल पंपाचा हिस्सा दिला नाही, या कारणावरून संबंधितांनी कट रचून हा खून केला असल्याचे सम्राट निकमचे चुलते संजय निकम (वय ५१, रा. कोडोली सातारा) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.