तासगावच्या विकासाला रखडलेल्या योजनांचे ग्रहण

By Admin | Updated: May 21, 2015 00:03 IST2015-05-20T23:00:00+5:302015-05-21T00:03:12+5:30

कारभाऱ्यांची उदासीनता कारणीभूत : कोट्यवधीचा खर्च होऊनही कामे अपूर्ण, ठेकेदारांना मात्र अभयदान

Eclipse schemes for the development of Tasgaon | तासगावच्या विकासाला रखडलेल्या योजनांचे ग्रहण

तासगावच्या विकासाला रखडलेल्या योजनांचे ग्रहण

दत्ता पाटील - तासगाव -तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तत्कालीन गृृहमंत्र्यांनी अनेक योजनांना मंजुरी मिळवून दिली; मात्र शहर सांभाळणाऱ्या कारभाऱ्यांना या योजना मार्गी लावण्यात अपयश आले. शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या पाणी योजनेचे काम पाच वर्षांपासून रखडलेले आहे. मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाचे कामही अद्याप अर्धवट आहे. या योजनांना मुदतवाढ देऊनही पूर्ण झालेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही विकासाचा खेळखंडोबाच झाल्याचे तासगाव शहराचे चित्र आहे.
तासगाव शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून २०४० पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून तासगाव नगरपालिकेकडून विस्तारित पाणी योजनेचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला.
२१ कोटी ५० लाख रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली. जीवन प्राधिकरणमार्फत या योजनेचे काम सुरू करण्यात आले. २०१० मध्ये तीन टप्प्यात कामाला सुरुवात करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात पुणदी रोडचे काम प्रस्तावित होते. या ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र वितरण व्यवस्थेचे काम अर्धवटच राहिले आहे. दुसऱ्या टप्प्यात दत्तमाळ परिसराचे काम होते. येथे वितरण व्यवस्थेचे काम झाले; मात्र टाकीचे काम अपूर्ण राहिले आहे. तिसऱ्या टप्प्यात लांडघोल मळा परिसरातील काम होते. या ठिकाणी तर केवळ खांब उभारण्यात आले. टाकी आणि वितरण व्यवस्थेच्या कामाचा अद्याप पत्ताच नाही. जलशुध्दीकरण यंत्रणेचे कामही अर्धवट करण्यात आले आहे. तीन टप्प्यातील कामे टप्प्या-टप्प्याने करण्याऐवजी ठेकेदाराकडून एकाचवेळी सर्व कामांची सुरुवात करण्यात आली.
तीन वर्षांत काम पूर्ण करण्याची मुदत असतानादेखील काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतही संपली. २१ कोटी ५० लाखांपैकी १८ कोटी खर्ची पडले. तरीही काम रखडलेलेच आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी काही नगरसेवकांनी ठेकेदाराला कोंडून घालून झाडाझडतीही केली होती; मात्र अद्यापही काम जैसे थे आहे. हे काम मार्गी लागावे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांकडून सातत्यपूर्ण पाठपुरावा झाल्याचे दिसून आले नाही. किंंबहुना अधिकारी आणि पदाधिकारी ठेकेदारापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे.
शहराच्या विकासात मोलाची भर टाकणारी दुसरी योजना व्यापारी संकुलाची आहे. मध्यवर्ती बसस्थानकालगतच महत्त्वाकांक्षी व्यापारी संकुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी ३ कोटी ७० लाखांची तरतूद करण्यात आली. २०११ मध्ये कामाला सुरुवात झाली. तीन वर्षांची कामाची मुदत संपली. कासवगतीने काम सुरू असल्यामुळे पुन्हा दोन वर्षांची वाढीव मुदत संबंधित ठेकेदाराला देण्यात आली. तरीही अद्याप हे काम पूर्णत्वास आलेले नाही.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि नगरपालिकेतील कारभाऱ्यांच्या गाफीलपणामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी योजनांसाठी खर्च होऊनही कामांची वाताहत झाल्याचे चित्र
आहे.



तासगाव शहराचा शांघाय करण्याची आश्वासने देत येथील नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या गेल्या. आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ताकद वापरून मंत्रालयीन पातळीवरून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. येथील सत्ताधाऱ्यांकडून वरवरचा विकास झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला. प्रत्यक्षात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे संगनमत, विकासाची उदासीनता, राजकीय लपंडाव यामुळे शहराच्या विकासाचा खेळखंडोबाच झाला. त्याचा वेध घेणारी मालिका आजपासून...


विस्तािरत पाणी योजना
२१ कोटी ५० लाख
व्यापारी संकुल
३ कोटी ७० लाख
एकूण २५ कोटी २० लाख

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंत्रालयात वजन वापरून योजना मंजूर करून आणल्या खऱ्या; मात्र इथल्या कारभाऱ्यांच्या आत्मसंकुचित वृत्तीमुळे त्या अद्यापही पूर्णत्वास आलेल्या नाहीत. त्या केव्हा पूर्ण होतील, याचे उत्तर अद्याप तरी तासगावकरांना मिळालेले नाही.


निधी नगरपालिकेचा आणि काम जीवन प्राधिकरणचे अशी अवस्था असल्यामुळे पाणी योजनेचे काम रखडलेले आहे. कामाबाबत ठेकेदाराकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच हे काम पूर्ण होईल. तसेच व्यापारी संकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दोन महिन्याची मुदत दिली आहे. त्यानुसार काम पूर्ण न झाल्यास ठेकेदाराचे काळ्या यादीत नाव टाकण्यात येणार आहे.
- संजय पवार,
नगराध्यक्ष, तासगाव

Web Title: Eclipse schemes for the development of Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.