दुर्गामूर्ती कामात कलाकाराची कसोटी

By Admin | Updated: September 16, 2014 23:57 IST2014-09-16T21:37:39+5:302014-09-16T23:57:41+5:30

वर्गणीचा परिणाम : गणेशमूर्तींपेक्षा किंमती कमीच

Durgamurti work to the artist's test | दुर्गामूर्ती कामात कलाकाराची कसोटी

दुर्गामूर्ती कामात कलाकाराची कसोटी

सातारा : भक्तांच्या लाडक्या बाप्पांच्या निरोपानंतर आता कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे ती दुर्गोत्सवाची! दुर्गा देवीची मूर्ती घडविणे क्लिष्ट असले तरीही तिच्या किंमती कमी आहेत. याला कारण मंडळांना मिळणारी वर्गणी असल्याची माहिती पुढे आली आहे.
लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर भक्तांना वेध लागतात ते दुर्गादेवीचे. विविध रूपातील आणि आकारातील दुर्गा मूर्ती तयार करण्याचे काम कुंभारवाड्यात सुरू आहे. गणपतीची ८- १० फुटी मूर्तीची किंमत यंदा सुमारे २८ हजार रूपये होती. मात्र, दुर्गादेवीची ८- १० फुटी मूर्तीची किंमत अवघे १३ हजार रूपये म्हणजेच जवळपास निम्मी!
दुर्गामूर्ती साकारताना खुप बारिक कलाकुसरही करावी लागते. देवीचे डोळे, केसांची ठेवण, साडी, अलंकार, देवीच्या हातातील विविध शस्त्रे, सिंह, राक्षस आदी गोष्टींवर कलाकारांना बरीच मेहनत करावी लागते. ही मूर्ती साकारण्यासाठी कलाकारांना वेळही तुलनेने खुपच कमी मिळतो. म्हणून जादा कारागीर लावून हे काम पूर्ण केले जाते.
या मूर्ती घडविताना त्यांना होणारा त्रास आणि येणारा खर्च याचा ताळमेळ घातल्यास असे लक्षात येते की कारागीर गणपती मूर्तीला अधिक पैसे घेतात. याविषयी अधिक माहिती घेतली असता, नाव न छापण्याच्या अटीवर एका मूर्तीकाराने सांगितले की, ‘गणेशोत्सव मंडळांना देणगी आणि वर्गणी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. त्यामुळे मंडळे महागड्या मूर्ती घेतात. गणपतीनंतर पंधरा दिवसांतच येणाऱ्या दुर्गात्सवाला देणगी देण्यासाठी लोक इच्छुक नसतात. त्यामुळे दुर्गा मंडळांना वर्गणीचे पाठबळ मोठे नसते.त्यामुळे त्यांच्या बजेटनुसारच त्यांच्याकडून मूर्तीचे पैसे घेतले जातात.’ सध्या दुर्गात्सवाची जागोजागी जोरदार तयारी सुरु आहे. (प्रतिनिधी)

दुर्गेने बदलले वाहन!
येथील कामाठीपुरा पेठेतील एका मंडळाने वेगळी मूर्ती करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कुंभारवाड्यात ही मूर्ती तयार होत आहे. दुर्गा देवीचे वाहन सिंह असते, या मंडळाने मात्र दुर्गेचे वाहन बदलले आहे. यंदा दुर्गा नंदी बैलावरून येणार आहे. दरवर्षी दुर्गेचे एक - एक रूप साकारण्याचा संकल्प करणाऱ्या या मंडळाची ही मूर्तीही भक्तांच्या आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे.

या मूर्ती घडविताना त्यांना होणारा त्रास आणि येणारा खर्च याचा ताळमेळ घातल्यास असे लक्षात येते की कारागीर गणपती मूर्तीला अधिक पैसे घेतात. गणेशोत्सव मंडळांना देणगी आणि वर्गणी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. त्यामुळे मंडळे महागड्या मूर्ती घेतात, असेही दिसून आले.

Web Title: Durgamurti work to the artist's test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.