आधुनिकतेमुळे ‘सुंदर माझं जातं’ कालबाह्य
By Admin | Updated: May 8, 2015 00:18 IST2015-05-07T23:06:35+5:302015-05-08T00:18:29+5:30
ग्रामीण भाग : घरातील जात्याला अखेरची घरघर

आधुनिकतेमुळे ‘सुंदर माझं जातं’ कालबाह्य
सातारा : तंत्रज्ञानामुळे व इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणांमुळे महिला वर्गाला स्वयपांक घरात बरीच मदत होत असल्याने महिलांचा बराचसा वेळ व श्रम यामध्ये बचत होत आहे. मिक्सर, चक्की या आधुनिक उपकरणांमुळे ‘जातं’ आता घरातून, ग्रामीण भागातून केवळ शोभेपुरतेच उरलेले आहे. जात्याच्या घरघर आवाजाबरोबर पहाटेच्यावेळी कानावर पडणारे गीतांचे सूरही काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
यांत्रिकीकरणामुळे मानवाच्या श्रमात व वेळेतही प्रचंड बचत झाली आहे. आता प्रत्येक क्षेत्र यंत्रांनी काबीज केले आहे. त्यामुळे कमी वेळात काम करण्यासाठी तसेच आपल्याकडील यंत्रामुळे समाजात मिळणारी प्रतिष्ष्ठा लक्षात घेता प्रत्येकजण यंत्राकडे आकर्षित होत आहे. पूर्वी घराघरात ‘जातं’ हे दळणाचे साधन होते. या जात्यावर पहाटेच्या वेळी घरातील महिला दळणाचे काम करीत असत. महिला जात्यावर गाणे गात. या गीतांमध्ये पारंपरिक लोकगीतांच्या प्रकर्षाने समावेश असायचा. पहाटेच्या वेळी जात्यांवर धान्य दळणाऱ्या महिलांच्या कंठातून बाहेर पडणारे मंजुळ स्वर वातावरणात मांगल्य निर्माण करत होते. काळानुसार मनुष्याच्या गरजा बदलत गेल्या. त्यानुसार विविध यंत्रसामुग्री मनुष्याच्या दिमतीला आली. त्यातून घरातील जात्याची जागा आता मिक्सर व पीठ गिरणीने घेतली आहे.
परिणामी ग्रामीण भागातील परंपरेनुसार महत्त्वाचे ठरलेले जाते. काळाच्या ओघात हरवले आहे. ग्रामीण भागात पूर्वी दळण्यासाठी जाते हेच ग्रामीण भागातील उपजीविका, विविध सण, उत्सव याची माहिती लयबद्धरीत्या गायली जायची. बदलत्या काळानुसार सर्व काही बदलते. बदलत्या काळातील साधने वापरणे, हे आता प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. त्यामुळे पारंपरिक साधने कालबाह्य होऊ लागली आहेत. (प्रतिनिधी)
पहाटेच्या गीतांचे सूर पडद्याआड
पूर्वीच्या काही महिलावर्ग पहाटे चार वाजल्यापासून जात्यांवर दळण दळण्यासाठी बसत होत्या. दररोज हा प्रकार सुरू होता. एका दिवशी लागणारे दोन्हीवेळचे दळण जात्यावर दळले जायचे. यावेळी ‘सकाळच्या पारी सूर्य उगवला माझ्या दारी, तोकी टाकीला काळ चिरा, सांच्या पाराचा रंग न्यारा ,’ अशी मंजुळ स्वरांनी वातावरण मांगल्य होऊन जायचे; परंतु सध्याच्या आधुनिक उपकरणांमुळे पहाटेचे स्वर काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
फक्त लग्नकार्यावेळी उपयोग
जात्यांचा उपयोग जरी घरामध्ये होत नसला तरी सध्या लग्नसराईचा मौसम असल्याने लग्नसमारंभातील हळद दळण्यासाठी जात्याचा उपयोग केला जातो? केवळ परंपरा म्हणून ग्रामीण, शहरी भागात काही ठिकाणी हा प्रकार सुरू आहे.