वडूजचे डॉ. भंडारे यांचा चारचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू, संरक्षक कठडे नसल्याने अपघातात वाढ
By जगदीश कोष्टी | Updated: September 3, 2022 18:52 IST2022-09-03T18:52:29+5:302022-09-03T18:52:54+5:30
आधारकार्डवरील पत्त्यामुळे नागरिकांनी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली

वडूजचे डॉ. भंडारे यांचा चारचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू, संरक्षक कठडे नसल्याने अपघातात वाढ
वडूज : भिगवण-मिरज राज्यमार्गावर खटाव तालुक्यातील धोंडेवाडी हद्दीत चारचाकी वाहन ओढ्यातील झाडावर आदळल्याने वडूजचे डॉ. प्रसन्न भंडारे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, दि. ३ रोजी सकाळी अकराच्या सुमारास झाला.
घटनास्थळ व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भंडारे हे मायणी येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल या मेडिकल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी मायणीहून वडूजला येताना अकराच्या सुमारास धोंडेवाडी हद्दीत थोरातवस्ती जवळील विठ्ठल थोरात यांच्या मालकीच्या शेतानजिक असणाऱ्या एका ओढ्याला लागून असलेल्या झाडावर डॉ. भंडारे यांची चारचाकी (एमएच ११ बीव्ही ९०७४) जोरात आदळली. त्यामध्ये चारचाकीचे मोठे नुकसान होऊन वाहनाचा चेंदामेंदा झाला.
अपघातात डॉ. भंडारे यांच्या छाती, बरगड्या व हृदयाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने नजिकच्या काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन ओढ्यातील बाभळीच्या झाडावर आदळून पलटी झालेली चारचाकी पुन्हा उभी करून डॉ. भंडारे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत असणाऱ्या आधारकार्डवरील पत्त्यामुळे नागरिकांनी येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.
घटनास्थळी मेडिकल कॉलेजचे पदाधिकारी, कर्मचारी, पोलीस व नागरिकांनी तातडीने धाव घेतली. मृत डॉ. प्रसन्न हे प्रख्यात आयुर्वेदतज्ञ व माऊली आयुर्वेद व पंचकर्म सेंटरचे संचालक डॉ. किशोर भंडारे यांचे चिरंजीव होत. डॉ. प्रसन्न यांनी आयुर्वेदातील एम.डी.चे शिक्षण पूर्ण केले असून ते वैद्यकीय व्यवसायाबरोबरच मायणी येथे आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापनास जात होते. ते वडूज मेडीकल असोसिएशन व निमा या वैद्यकीय संस्थांचे सक्रीय सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, बंधू असा परिवार आहे. ही अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.