घरातून डोकावू नका, आरक्षणाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा; मनोज जरांगेंचं समाजाला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 20:04 IST2024-08-10T20:04:01+5:302024-08-10T20:04:53+5:30
"लाखोंनी लढलो तरच सरकारला धग जाणवेल."

घरातून डोकावू नका, आरक्षणाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा; मनोज जरांगेंचं समाजाला आवाहन
दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई बंद पाडण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी ताकद लावली आहे. परंतु, मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणाचा हा प्रश्न असून सर्व क्षेत्रातील मराठ्यांनी ताकदीने लढा द्यायचा आहे. आता इमारतीच्या गॅलरीतून डोकावून पाहू नका तर प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हा. तरच सरकारला आंदोलनाची धग जाणवेल व ओबीसीतून आरक्षण मिळेल, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी साताऱ्यातून राज्यातील सर्व मराठा बांधवांना केले. सातारा शहरातून भव्य रॅली काढल्यानंतर गांधी मैदानावरील आयोजित सभेत ते बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाला न्याय हवा असेल तर घराबाहेर पडावे लागेल. राजकीय नेते दबाव आणतील. पण दबावाला बळी पडाल तर लेकरांच्या आयुष्याचे वाटोळे होईल. नेत्यांची लेकरे तुम्ही मोठे केली, त्यांना तुम्ही असला-नसला तरी काही फरक पडणार नाही.
जरांगे-पाटील पुढे म्हणाले, लोकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यामुळे दहा लोकं असो की दहा लाख, मी लढा सुरू ठेवणार असून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. नेत्यांनी दबाव आणला तरी घरात बसू नका. एवढ्या मोठ्या ताकतीने लढाई पुन्हा होणार नाही. घरात टीव्हीवरून, इमारतींच्या गॅलरीतून आंदोलन पाहू नका तर रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष सहभागी व्हा. नोकरदार, व्यावसायिक अशा सर्व क्षेत्रातील सर्व मराठ्यांना आंदोलनसाठी एक दिवस द्यावा लागेल. तरच याची धग सरकारला जाणवेल. त्यातून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. या आरक्षणाची काय किंमत आहे ते आपल्या लेकरांना विचारा, असे आवाहन त्यांनी केले.
सततच्या उपोषणामुळे जरांगेंना अशक्तपणा
मराठा आरक्षणासाठीच्या बेमुदत उपोषणामुळे जरांगे-पाटील यांना अशक्तपणा जाणवत होता. भाषण सुरू असतानाच त्यांच्या पाठीतून चमका आल्यानंतर एका मराठा सेवकाने त्यांना बॅकसपोर्ट बेल्ट आणून दिला. तो बांधल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केले. प्रकृती कमजोर असूनही नेता भाषण देत असल्याने उपस्थित मराठ्यांनी उत्स्फूर्त घोषणा दिल्या.
कुणबी प्रमाणपत्र वैध ठरवल्यास हिसका दाखवेन
सरकारने न मागितलेले दहा टक्के आरक्षण दिले आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निघत असून त्याची अधिकारी वैध ठरवत नाहीत. येत्या आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास हिसका दाखवला जाईल, इशाराही जरांगे यांनी दिला.