अमृतमहोत्सवीवर्षी सेवागिरी महाराजांच्या रथावर ७५ लाखांची देणगी; परदेशी चलनांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 17:02 IST2022-12-23T17:01:32+5:302022-12-23T17:02:07+5:30
बघताबघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाेळून गेला

अमृतमहोत्सवीवर्षी सेवागिरी महाराजांच्या रथावर ७५ लाखांची देणगी; परदेशी चलनांचाही समावेश
केशव जाधव
पुसेगाव : इतर राज्यांसह महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पुसेगावात आलेल्या भाविक-भक्तांनी महाराजांच्या संजीवन समाधीच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षात एकाच दिवसात ७४ लाख १८ हजार ४८५ रुपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर मनोभावे अर्पण केली.
कोरोना काळाच्या दोन वर्षांनंतर निघालेल्या पहिल्याच रथ मिरवणुकीत तब्बल लाखो रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवार, दि. २२ रोजी पुसेगाव येथे सेवागिरी रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. रथ मिरवणुकीदरम्यान रथावर अमेरिका, इंग्लंडसह विविध देशांतील परदेशी चलनांच्या नोटाही अर्पण केल्या.
रथोत्सवादिवशी पहाटेपासूनच भाविकांची संख्या वाढत होती. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोटांच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी अकरा वाजल्यापासून गर्दीत प्रचंड वाढ होऊन बघताबघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाेळून गेला. यंदा दरवर्षीपेक्षा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ दिवसभरात दिसून आली. भाविकांनी आपापल्या परीने १ रुपयापासून २ हजार रुपयांच्या नोटांच्या माळा करून रथावर अर्पण केल्याने महाराजांचा रथ नोटांनी शृंगारलेला होता.
परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला आणि रात्री १० वाजता मिरवणूक संपवून रथ माघारी मंदिरात पोहोचला. श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरासमोर नोटांनी शृंगारलेल्या रथावरून नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज हॉलमध्ये नेण्यात आली.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव यांच्यासह विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले.
युरो, पौंडही अर्पण
श्री सेवागिरी महाराजांचा लौकिक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. साता समुद्रापार महाराजांची कीर्ती पसरत आहे. यावर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर देणगी रकमेत भारतीय चलनाबरोबरच इतर देशातील चलनी नोटाही भक्तांनी अर्पण केल्या. यामध्ये थायलंडच्या बात, युनायटेड अरब अमिरातीच्या धीरमच्या नोटा, कतारचा रियाल, युरो नोटा, इंग्लंडचे पौंड, युएसएच्या डॉलरच्या नोटा, दुबईच्या चलनी नोटा तसेच कुवेत, इंडोनेशिया, सुदान, युके, झिंम्बावे, बांगलादेशच्याही नोटांचा समावेश आहे.