डोंगरात डोलतोय उसाचा तुरा !
By Admin | Updated: April 7, 2015 01:31 IST2015-04-06T21:50:04+5:302015-04-07T01:31:10+5:30
सुशिक्षित युवकाचा यशस्वी प्रयोग : जेसीबीने फोडला खडक, साडेतीन हजार फूट पाईपलाईन

डोंगरात डोलतोय उसाचा तुरा !
पोपट माने - तळमावले -शिकलेला माणूस शेती पासून दूर जातो, असे म्हणतात; पण बोरगेवाडी, ता. पाटण येथील एका सुशिक्षित युवकाने जिद्द, चिकाटी बाळगून कष्टाच्या जोरावर माळरानावर एक एकर शेत तयार करून उसाचे चांगले उत्पादन घेतले आहे. कुंभारगावपासून जवळच असलेल्या बोरगेवाडी येथील युवक राजेंद्र बोरगे याचे ‘दरा’ नावाचे पूर्ण पडीक असलेले माळरान होते. या माळरानावर काहीही पीक उगवत नव्हते. या माळरानावर ऊसशेती करण्याचा विचार करून राजेंद्र बोरगे या युवकाने जेसीबी मशीन भाडेतत्त्वावर आणून संपूर्ण रानातील खडक बाजूला काढून जमिनीचे सपाटीकरण करून घेतले. गावाजवळच असलेल बंधाऱ्यातील गाळ स्वखर्चाने काढून त्या शेतात टाकला. याला सुमारे एक लाख वीस हजार रुपये खर्च झाला.
शेतीला पाणी देण्यासाठी बोरगे यांनी ओढ्याच्या कडेला असलेल्या विहिरीवर वीजपंप बसवून सुमारे साडेतीन हजार फूट पाईपलाईन करून या माळरानावरील शेतात नेले. या पाईपलाईनला दीड लाख रुपये खर्च झाला. यासाठी बोरगे यांना कर्ज काढावे लागले. परंतु बोरगे यांनी ऊसशेती करण्याचा जणू चंगच बांधला होता. या शेताची मशागत करून शेणखत टाकून सरी सोडून ०३१.०२ या जातीच्या उसाचे बियाणे आणून त्याची लागण केली; पण संपूर्ण ओसाड असलेल्या या माळरानावर दुसऱ्या कसल्याही प्रकारचे पीक नसल्याने जनावरांचा उपद्रव होऊ लागला. त्यासाठी त्यांनी संपूर्ण शेतीला तारेचे कुंपण घातले.
प्रत्येक ऊस सुमारे दोन किलोचा
या शेतात लागण केलेला ऊसही चांगला जोमात आला असून, एका उसाचे वजन सरासरी दोन किलोच्या आसपास आहे. या एक एकरात साधारणपणे साठ ते सत्तर टन उसाचे उत्पादन मिळेल, अशी बोरगे यांना अपेक्षा आहे.
मला लहानपणापासून शेतीची आवड आहे. परंतु शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. कुंभारगाव विभागात चाळकेवाडी येथे झालेल्या तलावामुळे ओढ्यासह ओढ्याच्या आजूबाजूच्या विहिरीत पाणीसाठा होऊ लागला त्यामुळे उसासारखे पीक घ्यायचा निर्णय घेतला.
- राजेंद्र बोरगे, शेतकरी