काहीही करा.. आम्ही इथंच बसणार ! सातारा पालिका प्रशासन हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 21:45 IST2018-12-19T21:41:41+5:302018-12-19T21:45:00+5:30
राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली.

राजवाडा ते मंगळवार तळे या मार्गावरील अतिक्रमणे पालिकेच्या वतीने काढण्यात आली. मात्र, पुन्हा भाजी व फळविक्रेत्यांनी या मार्गावर आपले बस्तान बसविले आहे.
सातारा : राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली. रस्त्यावर भाजी, फळे विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होईना. कारवाई करूनही या रस्त्यावरील अतिक्रमण पुन्हा फोफावत असल्याने आता प्रशासनही पुरते हतलब झाले आहे.
राजवाडा भाजी मंडईची उभारणी केल्यानंतर सर्व भाजी विक्रेत्यांचे या मंडईत पुनर्वसन करण्यात आले. वाहतुकीला अडथळा ठरू नये म्हणून फळविक्रेत्यांनाही या मंडईत जागा देण्यात आली. मात्र, फळविक्रेत्यांना ग्राहक येत नसल्याचे कारण देत मंडईत व्यवसाय करण्यात नकार दर्शविला. त्यामुळे अनेक फळविक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावरच फळविक्री करीत आहेत.
पालिकेने विक्रेत्यांना चकाचक मंडई बांधून दिली. मात्र, अतिहव्यासापोटी मंडईत बसणाºया व्यावसायिकांनी रस्त्यावरही ठाण मांडले. पालिकेची पावती फाडण्याची वेळ टळून गेल्यानंतर टोपल्या आणि हातगाड्या घेऊन ही मंडळी राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर बसतात. यामुळे वाहतुकीची कोंडी आणि किरकोळ अपघातांची संख्या वाढतच चालली आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील होत गेल्याने पालिकेच्या वतीने या मार्गावरील सर्व अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविली होती. कारवाईनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. काही दिवसांनंतर पुन्हा हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला. सध्या राजवाडा बसस्थानकापासून मंगळवार तळ्यापर्यंत भाजी विक्रेते, व्यावसायिकांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. कारवाई करूनही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने आता प्रशासनही हतलब झाले आहे.
रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग
राजवाडा ते मंगळवार तळे या मार्गावर भाजी व फळविक्रेत्यांची संख्या अधिक आहे. भाजी मंडई सोडली तर इतरत्र कोठेही पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दररोज वाहने पार्क केली जात आहे. त्यामुळे गर्दीतून वाट काढताना वाहनधारकांसह नागरिकांनी दमछाक उडत आहे. याबाबत ठोस कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
सकाळी फळे.. रात्री भाजी विक्री
नो हॉकर्स झोन असतानाही राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर हंगामी व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे. या रस्त्यावर सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत फळांचे गाडे असतात तर सायंकाळी पाचनंतर येथे भाजीमंडई भरते. विक्रेते व वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना सकाळी शालेय विद्यार्थी तर सायंकाळी नोकरदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.