उदयनराजेंच्या साताऱ्यात गणेशोत्सावात डीजे वाजणार; पण ध्वनिमर्यादेचे निर्बंध !
By सचिन काकडे | Updated: August 30, 2022 20:55 IST2022-08-30T20:54:41+5:302022-08-30T20:55:33+5:30
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सशर्त परवानगी

उदयनराजेंच्या साताऱ्यात गणेशोत्सावात डीजे वाजणार; पण ध्वनिमर्यादेचे निर्बंध !
सातारा : गणेशोत्सवात डीजे वाजणार की नाही? याबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला मंगळवारी पूर्णविराम मिळाला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ध्वनिमर्यादेचे निर्बंध कायम ठेवत ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत डीजेला परवानगी देत असल्याचे जाहीर केले आहे.
सातारा शहरात सात वर्षांपूर्वी घडलेल्या एका दुर्घटनेनंतर डीजेवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. याचा डीजेचालकांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे यंदाच्या उत्सवात तरी डीजेला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी डीजे चालकांकडून केली जात होती. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील ध्वनिमर्यादेचे निर्बंध घालून डीजेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने काही झालं तरी डीजेला परवानगी नाही, अशी भूमिका घेतल्याने गणेशोत्सवात डीजे दणाणणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
अखेर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी न्यायालय व ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार डीजेला परवानगी देत असल्याचा सुधारित आदेश मंगळवारी काढला. या आदेशानुसार ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत डीजेला परवानगी देण्यात आली आहे. आवाजाची मर्यादा प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी, डीजे चालक-मालक कारवाईस पात्र ठरतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अशी आहे ध्वनिमर्यादा...
क्षेत्र ध्वनिमर्यादा (डेसीबलमध्ये)
दिवसा रात्री
औद्योगिक क्षेत्र ७५ ७०
वाणिज्य क्षेत्र ६५ ५५
निवासी क्षेत्र ५५ ४५
शांतता क्षेत्र ५० ४०