The district was disturbed by the Ramo Rajan's Namo Movement | रामराजेंच्या नमो मूव्हमुळे जिल्ह्यात खळबळ

रामराजेंच्या नमो मूव्हमुळे जिल्ह्यात खळबळ

ठळक मुद्देएका चालित अनेक प्याद्यांची शिकार स्थानिक विरोधकांची कोंडी करण्यासाठी नवा डाव

सातारा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अचानकपणे नमो मूव्ह घेत भाजपमध्ये प्रवेशाच्या हालचाली सुरु केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहेच, त्याव्यतिरिक्त त्यांचे राजकीय विरोधक असणाऱ्या मंडळींची कोंडी करण्याची व्यूहरचना त्यांनी आखल्याचे या निमित्ताने पहायला मिळते.

रामराजेंनी भाजपकडे तीन जागांचा प्रस्ताव मांडल्याची जोरदार चर्चा आहे. फलटण, वाई आणि कुलाबा या तीन मतदारसंघांची त्यांनी मागणी केली आहे. कुलाबा मतदारसंघात त्यांचे जावई राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी द्यावी, अशी त्यांची इच्छा आहे. फलटण मतदारसंघ तर त्यांचे होम पिच आहे, हा मतदारसंघ राखीव असल्याने तो आपल्याला मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. या ठिकाणी आपल्या निकटवर्तीयाला ते संधी देऊ शकतात.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना रामराजेंचा शब्द मानावाच लागणार आहे. फलटण तालुक्यात रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे रामराजेंचे कट्टर विरोधक आहेत. दिगंबर आगवणेंना भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी रणजितसिंहांचे प्रयत्न सुरु होते. आता त्यांची राजकीय कोंडी करण्याची मोठी खेळी रामराजेंनी खेळली आहे. माण-खटाव मतदारसंघावरही रामराजेंचा प्रभाव आहे. आमदार जयकुमार गोरेंचा हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्याआधीच रामराजेंनी भाजपची झूल पांघरायचा विचार सुरु केल्याने आ. गोरे यांची कोंडी होणार आहे.

दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून रामराजेंनी जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवला. त्या लक्ष्मणतात्यांचे चिरंजीव असणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात रामराजेंनी उमेदवारी मागितल्याची जोरदार चर्चा आहे. खंडाळा तालुक्याच्या राजकारणात रामराजेंनी कायमच आपले लक्ष घातले आहे.

सध्याच्या घडीला खंडाळा तालुक्यात अनेक घडामोडी घडताना दिसत असून आ. मकरंद पाटील यांचे विरोधक मोट बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मदतीने खंडाळ्यातील अस्वस्थ मंडळी आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात रान उठवू शकतात, असे चित्र या निमित्ताने पुढे येऊ लागले आहे.

उदयनराजेंचे पक्षातील महत्त्व जाचक

खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये, यासाठी रामराजेंनी राष्ट्रवादीकडे मागणी केलेली होती. आपल्या विरोधकांना ते पाठबळ देतात, तसेच जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची उकाळी-पाकाळी काढण्याचे काम उदयनराजे करतात, अशी तक्रार त्यांनी वारंवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे केली होती. तरीही पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंनाच उमेदवारी दिली. उदयनराजेंचे महत्त्व आपल्यापेक्षा पक्षाला जास्त असल्याची सल रामराजेंच्या मनात आहे.

या मतदारसंघांवर होऊ शकतो प्रभाव

रामराजेंनी जर भाजपमध्ये प्रवेश केलाच तर जिल्ह्यातील वाई, फलटण, कोरेगाव, माण-खटाव या चार मतदारसंघात राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. सातारा-जावळी मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेलाही यानिमित्ताने बळ मिळणार आहे.
 

Web Title: The district was disturbed by the Ramo Rajan's Namo Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.