Satara: तापोळा येथील दोन बोट क्लबमधील वाद; विशाल बोट क्लब सदस्यांचा जलसमाधीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:11 IST2025-01-24T12:10:57+5:302025-01-24T12:11:28+5:30
जुन्या नियमांचा फेरविचार करावा

Satara: तापोळा येथील दोन बोट क्लबमधील वाद; विशाल बोट क्लब सदस्यांचा जलसमाधीचा इशारा
महाबळेश्वर : तापोळा येथील दोन बोट क्लबमधील वाद सोडविण्यासाठी पर्यटकांची विभागणी हा नियम आता जाचक ठरत असून तो रद्द करावा या मागणीसाठी विशाल बोट क्लब गेली अनेक वर्षे मागणी करीत आहे. परंतु, या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने विशाल बोट क्लबच्या सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या अन्यायाविरोधात प्रजासत्ताकदिनी विशाल बोट क्लबचे सभासद शिवसागर जलाशयात जलसमाधी घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती विशाल बोट क्लबचे अध्यक्ष सुभाष कारंडे यांनी दिली.
तापोळा येथे विशाल बोट क्लब व शिवसागर बोट क्लब असे दोन नोंदणीकृत बोट क्लब आहेत. यापैकी शिवसागर बोट क्लबचे २११ तर विशाल बोट क्लबचे ९२ सभासद आहेत. दोन्ही बोट क्लबच्या सभासदांनी पर्यटकांची हंगामासाठी विभागणी केली होती. यानुसार नौकाविहारासाठी प्रथम येणारे २५ पर्यटक हे शिवसागर बोट क्लबला तर पुढील १० पर्यटक हे विशाल बोट क्लबकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था केवळ हंगामासाठी करण्यात आली होती. परंतु गेली २० वर्षे या नियमानुसारच पर्यटकांची विभागणी केली जात आहे.
काळाच्या ओघात पुलाखालून बरेच पाणी गेले. शिवसागर बोट क्लबच्या सभासदांची संख्या कमी झाली. कमी झालेल्या सभासदांनी वेगवेगळे बोट क्लब स्थापन केले आहेत. बामणोली, शेंबडी, मुनावळे, तेटली, वानवली, उतेकर वानवली, आहिरे असे एका बोट क्लबचे सहा बोट क्लब स्थापन झाले आहेत. याच काळात शिवसागरच्या बोटीची संख्या कमी झाली. परंतु विशालमधील बोटींची संख्या वाढली आहे. जे नवीन बोट क्लब झाले त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पर्यटकांची विभागणी नाही. परंतु जुन्या बोट क्लबमध्येच ही विभागणी केली जात आहे.
वीस वर्षांपूर्वी केलेल्या पर्यटक विभागणीचा फटका आता विशाल बोट क्लबच्या सभासदांना बसत आहे. या नियमात बदल करावा व पर्यटकांची विभागणी बंद करावी. पर्यटकांना जिकडे जायचे असेल तिकडे ते जातील, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु प्रशासन या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने विशाल बोट क्लबमधील सभासदांवर अन्याय होत आहे.
जुन्या नियमांचा फेरविचार करावा
वीस वर्षांपूर्वी केलेल्या नियमांचा आढावा घ्यावा. अथवा तो रद्द करावा, अशी मागणी केली जात आहे, याबाबतचे निवेदन विशाल बोट क्लबच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार व महाबळेश्वर पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.