जीर्ण इमारती बनल्या पत्त्याचा बंगला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:45+5:302021-06-22T04:25:45+5:30
कऱ्हाड : जीर्ण इमारती म्हणजे कधीही कोसळेल असा पत्त्याचा बंगला. कललेल्या भिंती, निखळलेले दगड, मोडलेली लाकडं आणि खचलेला पाया ...

जीर्ण इमारती बनल्या पत्त्याचा बंगला!
कऱ्हाड : जीर्ण इमारती म्हणजे कधीही कोसळेल असा पत्त्याचा बंगला. कललेल्या भिंती, निखळलेले दगड, मोडलेली लाकडं आणि खचलेला पाया अशीच या इमारतींची अवस्था. कऱ्हाड शहरात अशाच अवस्थेत तब्बल ५३ इमारती तग धरून उभ्या आहेत. त्या केव्हा कोसळतील याचा नेम नाही; पण या इमारती हटविण्याऐवजी वर्षानुवर्षे पालिका कागदी घोडी नाचवत असल्याचे दिसते.
कऱ्हाड शहरात दिवसेंदिवस सिमेंट काँक्रीटच्या इमारतींची संख्या वाढत आहे. मात्र, कित्येक वर्षांपूर्वी दगड, पांढरी माती आणि लाकडापासून बांधण्यात आलेल्या इमारतींची अवस्था सध्या गंभीर बनली आहे. काही इमारतींचे दरवाजे, भिंती खिळखिळ्या झाल्या आहेत. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी अशा धोकादायक इमारती उभ्या आहेत. पावसाळ्यात अथवा इतर कोणत्याही दिवशी या इमारती ढासळून जीवित तसेच वित्तहानी होण्याची नाकारता येत नाही. दर वर्षी धोकादायक इमारतींचा पालिकेकडून सर्व्हे केला जातो. मात्र, संबंधित इमारतीच्या मालकांना नोटीस पाठविण्याव्यतिरिक्त इतर कसलीच कार्यवाही पालिकेकडून केली जात नाही. या वर्षी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये शहरातील ५३ इमारती धोकादायक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. संबंधित मालकांना नोटीस पाठविल्याचेही पालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, इमारत कोसळून दुर्घटना घडल्यानंतरच त्या इमारती हटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील मंगळवार पेठेतील एका जीर्ण इमारतीचा काही भाग चार दिवसांपूर्वी कोसळला. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, जीवित तसेच वित्तहानी होण्यापूर्वी पालिकेला जाग येणार का, हा प्रश्न आहे.
- चौकट
धोकादायक इमारती म्हणजे...
पालिकेने धोकादायक ठरविलेल्या इमारतींमध्ये काही ४० ते ५० वर्षांपूर्वीचे कच्चे बांधकाम असलेल्या इमारतींचा समावेश आहे. भेगा पडलेल्या पांढऱ्या मातीच्या भिंती, कुजलेल्या तुळई तसेच वासे, निखळलेले दगड, निसटलेली कौले अशा अवस्थेतील त्या इमारती आहेत. तसेच काही जुने वाडेही धोकादायक इमारतींमध्ये नोंदले गेले आहेत.
सर्वाधिक गुरुवार पेठेत तर सर्वात कमी सोमवार पेठेत
कऱ्हाड शहरातील एकूण इमारतींपैकी ५३ इमारती धोकादायक स्थितीत आढळल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक धोकादायक इमारती गुरुवार पेठेत असून, सोमवार पेठेत सर्वात कमी धोकादायक इमारती आहेत.
- चौकट
धोकादायक इमारती
सोमवार पेठ : ०३
मंगळवार पेठ : ११
बुधवार पेठ : ७
गुरुवार पेठ : १५
शुक्रवार पेठ : ०४
शनिवार पेठ : ०७
रविवार पेठ : ०६
- चौकट
नुकसान झाल्यास मालक जबाबदार
सर्व्हेत आढळलेल्या धोकादायक इमारतींच्या मालकांना पालिकेने तत्काळ इमारती उतरवून घेण्याच्या नोटीस पाठविल्या आहेत. संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी इमारत तातडीने उतरवून घ्यावी. अन्यथा त्या कोसळून दुर्घटना घडल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीस संबंधित इमारत मालक जबाबदार असतील, असे नोटीसमध्ये पालिकेने म्हटले आहे.
फोटो : २१केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडात अनेक वर्षांपूर्वीच्या जीर्ण इमारती तग धरून उभ्या आहेत. त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे.