तोतया पोलीस अधिकाऱ्याला पिस्तुलासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:20 IST2019-05-21T18:18:37+5:302019-05-21T18:20:24+5:30
सातारा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या गणेश वाईकर या तरुणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दरम्यान, गणेश वाईकर याने सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तोतया पोलीस अधिकाऱ्याला पिस्तुलासह अटक
सातारा : सातारा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या गणेश वाईकर या तरुणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दरम्यान, गणेश वाईकर याने सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गणेश गोपीनाथ वाईकर हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला या ठिकाणी राहात आहे. त्याने सातारा जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र तयार केले असून, त्याच्याजवळ बेकायदा पिस्तूल असल्याची माहितीही लोणावळा पोलिसांना मिळाली.
त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गणेश वाईकर याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्याच्याजवळ बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तूल सापडले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सातारा पोलीस दलाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले.
दरम्यान, गणेश वाईकरवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बनावट शासकीय ओळखपत्र बाळगणे तसेच आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाईकर याने सातारा पोलीस दलातील अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र बाळगल्यामुळे सातारा पोलीसही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.