Satara- घडतंय बिघडतंय: महाराष्ट्र केसरी, हिंद केसरींचे कराड दक्षिणेतील पैलवानांवर लक्ष!

By प्रमोद सुकरे | Updated: June 16, 2025 11:24 IST2025-06-16T11:23:15+5:302025-06-16T11:24:11+5:30

आता कोणत्या पैलवानासाठी ते कोणता डाव टाकणार?

Deputy Chief Minister Eknath Shinde has given the responsibility of increasing the organization of wrestlers in the state to Chandrahar Patil and Santosh Vetal | Satara- घडतंय बिघडतंय: महाराष्ट्र केसरी, हिंद केसरींचे कराड दक्षिणेतील पैलवानांवर लक्ष!

Satara- घडतंय बिघडतंय: महाराष्ट्र केसरी, हिंद केसरींचे कराड दक्षिणेतील पैलवानांवर लक्ष!

प्रमोद सुकरे 

कऱ्हाड: डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील व हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांनी नुकतेच शिंदेसेनेचे 'धनुष्यबाण' हातात घेतले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर राज्यात पैलवानांचे संघटन वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिल्याचे खात्रीशीर समजते. त्यामुळे पक्ष वाढीसाठी या दोघांचे प्रयत्न सुरू असून कराड दक्षिण मधील अनेक पैलवानांवर त्यांचे आता लक्ष आहे. नजीकच्या काळात काही पैलवानांनी त्यांच्याप्रमाणेच हातामध्ये 'धनुष्यबाण' घेतला तर आश्चर्य वाटायला नको.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेला कराड तालुका राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. तर लाल मातीतील कुस्ती आणि कराडचेही वेगळे नाते आहे. देशाला कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव याच मातीतले तर महाराष्ट्र केसरी म्हणून फड मारणारे पैलवान संजय पाटील याच मातीतले. या मातीने अनेक चांगले मल्ल आजवर महाराष्ट्राला दिले आहेत. तर येथील अनेक पैलवान कुस्ती संघटक म्हणून कार्यरत आहेत. कराड तालुक्यात अनेक मल्ल प्रशिक्षण केंद्रे आहेत. तर गोळेश्वर येथे दिवंगत खाशाबा जाधव यांच्या गावात आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल प्रस्तावित आहे.

कुस्तीच्या आखाड्यात रमणारे पैलवान राजकारणाच्या आखाड्यातही तितकेच रमतात हा इतिहास आहे. कराड तालुकाही त्याला अपवाद नाही. आजवर अनेक पैलवानांनी येथील राजकारणामध्ये आपला करिष्मा दाखवून दिला आहे. तर सध्या अनेक पैलवान राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आता यातीलच काही पैलवान आपल्या सोबत येतील का? याचीच चाचपणी सध्या चंद्रहार पाटील व संतोष वेताळ करीत असल्याचे खात्रीशीर समजते.

कराड तालुका हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. त्यामुळे येथे कराड दक्षिण व उत्तर असे विधानसभेचे २ मतदारसंघ आहेत. यातील उत्तरेतील हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ चंद्रहार पाटलांच्या बरोबर शिंदेसेनेत गेलेच आहेत. आता त्या दोघांनी मिळून आपला मोर्चा कराड दक्षिणेकडे वळवला आहे. त्यांच्यासोबत कोल्हापूरच्या तालमीत असणाऱ्या अनेक पैलवानांच्या ते संपर्कात आहेत. आता कोणत्या पैलवानासाठी ते कोणता डाव टाकणार हे पाहण्यासाठी थोडे थांबावे लागेल.

चंद्रहार पाटलांचे कराडशी घनिष्ठ संबंध

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील व कराड तालुक्याचे जवळचे आणि घनिष्ठ संबंध आहेत. महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील व त्यांच्यात गुरु शिष्याचे नाते होते. तर चंद्रहार पाटील यांची सासुरवाडी देखील कराड तालुक्यातील वडगाव हवेली आहे बरं!

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्याशी आमचे पूर्वीपासूनच एक पैलवान म्हणून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांनी आता शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. मी देखील त्यांच्यासोबत यावे यासाठी ते माझ्या संपर्कात आहेत. - पैलवान नाना पाटील (काले), सरचिटणीस, सातारा जिल्हा काँग्रेस 

Web Title: Deputy Chief Minister Eknath Shinde has given the responsibility of increasing the organization of wrestlers in the state to Chandrahar Patil and Santosh Vetal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.