अजित पवारांनाही तलवार, वाघनखं देणार : उदयनराजे
By सचिन काकडे | Updated: July 14, 2023 17:30 IST2023-07-14T17:29:17+5:302023-07-14T17:30:09+5:30
मंत्रिपद कोणाला मिळेल हे मी नाही सांगू शकत

अजित पवारांनाही तलवार, वाघनखं देणार : उदयनराजे
सातारा : 'भाजप नेत्यांना मी तलवार आणि वाघनख भेट देत आहे, याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये. असे असते तर जेव्हा मी राष्ट्रवादी पक्ष सोडला तेव्हाच तलवार, वाघनखं भेट दिले असते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी अभिनंदन केले असून, लवकरच त्यांना देखील तलवार आणि वाघनख भेट देणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
सातारा शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्यात आली असून, कास धरण ते सातारा सुमारे २७ किलोमीटर लांब नवीन जलवाहिनीचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी या कामाचे उद्घाटन खा. उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, सातारा जिल्ह्यात अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. जिल्ह्याला जर मंत्रीपद मिळालं तर जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होईल. परंतु मंत्रिपद कोणाला मिळेल हे मी नाही सांगू शकत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाबाबत छेडले असता ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच या बंडाबाबत विश्लेषण केले आहे. त्यामुळे जे त्यांचं मत आहे तेच माझंही आहे. भाजप नेत्यांना मी तलवार आणि वाघ नख भेट देत आहे, यामागे दुसरे कोणतेही कारण नाही. तलवार, वाघनख आम्ही भेट नाही द्यायची तर कोणी द्यायची?
सातारा जिल्हा बँकेचे संचालक अभ्यास दौऱ्यासाठी युरोपात गेले आहेत. याबाबत प्रश्न विचारतात उदयनराजे म्हणाले, आज तंत्रज्ञान कितीतरी पुढे गेलेले आहे. आपल्याला घरबसल्या संगणकावर, मोबाईलवर देखील बरीच माहिती मिळू शकते. कास परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी राज्याबरोबरच केंद्र शासनाकडे सक्षमपणे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.