पवारांनी तडजोड केल्याचा आरोप , स्वीकृत नगरसेवक प्रकरण : शहराध्यक्षांचा घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 20:37 IST2018-04-04T20:36:56+5:302018-04-04T20:37:44+5:30
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर न राहणाऱ्या तसेच पक्षाचा कोणताही कार्यक्रम न राबविलेल्या व्यक्तीस दीपक पवार यांनी आर्थिक तडजोड करून स्वीकृत नगरसेवकपदाची

पवारांनी तडजोड केल्याचा आरोप , स्वीकृत नगरसेवक प्रकरण : शहराध्यक्षांचा घरचा आहेर
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर न राहणाऱ्या तसेच पक्षाचा कोणताही कार्यक्रम न राबविलेल्या व्यक्तीस दीपक पवार यांनी आर्थिक तडजोड करून स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली असल्याचा आरोप भाजपाच्या सातारा शहराध्यक्ष सुनील कोळेकर यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा पालिकेत स्वीकृत नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे. मात्र, ज्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढविली त्यांना स्वीकृतसाठी संधी दिली गेली नाही. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी पार पाडली. पक्ष विस्तारासह विविध योजना घरोपरी पोहोचविल्या आणि सभासद वाढविले अशा कार्यकर्त्याला स्वीकृतची संधी देणे अपेक्षित आहे. मात्र, दीपक पवार यांच्या हट्टासाठी जे उमेदवार फक्त पालिका निवडणुकीपुरतेच भाजपमध्ये होते व नंतर पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर राहिले नाही अशांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली गेली. यासाठी दीपक पवार यांनी आर्थिक तडजोड केल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे.
प्रसिद्धी पत्रकावर सुनील कोळेकर यांच्यासह जयदीप ठुसे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, राजेंद्र पवार, अप्पा कोरे, नीलेश कदम, प्रदीप मोरे, रवी आपटे, संदीप मेळाट, अमोल कांबळे आदींच्या सह्या आहेत. दरम्यान, या संदर्भात दीपक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
(चौकट)
... तर कार्यकारिणीचा राजीनामा
दीपक पवार यांच्या मनमानी कारभाराला आणि शहर कार्यकारिणी पदाधिकाºयांना विश्वासात न घेण्याच्या कृती विरुद्ध शहर कार्यकारिणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.