'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 07:06 IST2025-10-26T07:04:01+5:302025-10-26T07:06:08+5:30
महिला डॉक्टर न्यायासाठी गेल्या पाच महिन्यांपासून पोलिस प्रशासनाकडे दाद मागत होती.

'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
सातारा : फलटण येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केलेली महिला डॉक्टर न्यायासाठी गेल्या पाच महिन्यांपासून पोलिस प्रशासनाकडे दाद मागत होती. तो मिळत नसल्याचे पाहून तिने माहिती अधिकाराचा वापरही केला. परंतु, इथेही तिच्या पदरी निराशाच आली.
फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हे प्रकरण हाय प्रोफाईल आणि अतिसंवेदनशील म्हणून पाहिले जात आहे. महिला डॉक्टरवर ही वेळ का आली? या अनुषंगाने आता पोलिस तपास करत असतानाच यामध्ये महिला डॉक्टरने मागितलेल्या न्यायाचे तपशील समोर येऊ लागले आहेत. महिला डॉक्टरने एकूण तीन अर्ज केले आहेत. पहिला तक्रार अर्ज १९ जून २०२५ रोजी केला आहे. हा अर्ज महिला डॉक्टरने फलटण उपअधीक्षक या नावाने लिहिला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, 'पोलिस कर्मचारी आरोपींना मेडिकलसाठी आणतात. त्यावेळी आरोपी फिट नसताना देखील 'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या' असा दबाव आणतात. याबाबत पोलिस निरीक्षक महाडिक यांना माहिती दिली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फलटण पोलिस उपअधीक्षक आपण यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी.' असा मजकूर त्यामध्ये आहे. त्याची पोहोच देखील तिने घेतली आहे.
पदरी निराशाच
दुसरा तक्रार अर्ज हा माहिती अधिकाराचा आहे. डीवायएसपी कार्यालयाकडे वरील तक्रार अर्ज केल्यानंतर त्यावर कोणती कार्यवाही केली, ही बाब माहिती अधिकारात १३ ऑगस्ट २०२५ रोजी मागवण्यात आली आहे.
तिसरा तक्रार अर्ज चार पानांचा आहे. हा तक्रार अर्ज चौकशी समिती जिल्हा रुग्णालय, सातारा यांच्या नावे केला आहे. या अर्जामध्ये प्रामुख्याने पोलिस प्रशासनाविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये सात ते आठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे नमूद केली आहेत.
यातील एका घटनेत खासदार व त्यांचा पीए असाही उल्लेख दिसून येत आहे. पोलिसांनी काही आरोपींना मेडिकल करण्यासाठी आणले होते. त्यावेळी खासदार यांचे पीए तेथे आले. त्या पीएने महिला डॉक्टरला फोन देऊन खासदार बोलत आहेत, असे सांगितले. महिला डॉक्टर खासदारांसोबत बोलत असताना खासदार असे म्हणाले की, 'पोलिस कर्मचाऱ्यांची कम्प्लेंट आहे की, तुम्ही आरोपींना फिट प्रमाणपत्र देत नाही.'
दानवे यांचे आरोप नाईक-निंबाळकर यांनी फेटाळले
माजी खा. रणजितसिंह यांना देखील सहआरोपी करा. निंबाळकर यांचे बंधू अभिजीत निंबाळकर हे स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा चालवतात आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आरोप फेटाळून लावत, या प्रकरणाचे गलिच्छ राजकारण करण्याऐवजी सखोल आणि निष्पक्ष चौकशी करा, असे म्हटले आहे.
महिला डॉक्टर आत्महत्या, वैद्यकीय क्षेत्रातून निषेध
फलटण येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा. तसेच, ग्रामीण भागातील डॉक्टरांना योग्य ते संरक्षण द्या, अशी मागणी डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे. 'केंद्रीय मार्ड' आणि मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर व कूपर रुग्णालयांतील 'बीएमसी मार्ड'ने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.