खातगुणमधील पाणीपुरवठा विहिरीमध्ये मृत उद मांजर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:01+5:302021-06-16T04:51:01+5:30
पुसेगाव : खटाव तालुक्यातील खातगुण येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत रानटी उद जातीचे मांजर सडलेल्या अवस्थेत आढळले आहे तर ...

खातगुणमधील पाणीपुरवठा विहिरीमध्ये मृत उद मांजर..
पुसेगाव : खटाव तालुक्यातील खातगुण येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत रानटी उद जातीचे मांजर सडलेल्या अवस्थेत आढळले आहे तर काही दिवसांपूर्वी मृत सापही दिसून आला होता. त्यामुळे कोरोनाशी लढताना काळजी घेणाऱ्या खातगुण ग्रामस्थांना आणखी कोणत्या आजारांची बाधा होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने वेळीच दखल घेणे गरजेचे बनलेले आहे.
खातगुण येथे ग्रामपंचायतीच्या जाखणगाव रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून नवीन वसाहत झालेल्या पूर्वेकडील भागाला पाणीपुरवठा होतो तर विसापूर रस्त्यालगत मवट नावाच्या शिवारामध्ये असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीतून मूळ गावाला पाणीपुरवठा होत असतो. याच विहिरीत दोन दिवसांपूर्वी रानटी उद जातीचे मांजर मृत आणि सडलेल्या स्थितीत पाण्यावर तरंगताना कर्मचाऱ्यांना दिसून आले. काहींच्या मते किमान पाच-सहा दिवसांपूर्वी हे मांजर विहिरीत पडले असण्याची शक्यता आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मृत सापही याच विहिरीत तरंगताना दिसून आल्याचे बोलले जात आहे तर त्यानंतर ५० हजार लिटरची क्षमता असलेल्या या टाकीतून एक दिवसाआड पाणीपुरवठा ही झाला आहे. आता ग्रामस्थ भीतीपोटी पाण्याचे कॅन मागवत असल्याचे चित्र आहे.
दूषित पाणी पिल्यामुळे सर्दी, खोकला, ताप तसेच इतर साथींचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच खातगुण ग्रामस्थ सध्या कसे-बसे कोरोना संकटातून सावरत आहेत. त्यातच हे दूषित पाणी पिल्याने इतर आजाराबरोबरच कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास याला जबाबदार कोण ? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने पाणीपुरवठा टाकीत दोन विद्युत पंपांच्या साह्याने काही प्रमाणात पाणी उपसा करण्यात आला तर उर्वरित पाण्यात टीसीएल पावडर मुबलक प्रमाणात टाकण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
टीप : कोट येणार आहेत...
फोटो दि.१४पुसेगाव खातगुण फोटो...
फोटो ओळ : खटाव तालुक्यातील खातगुणमधील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत रानटी उद जातीचे मांजर सडलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. (छाया : केशव जाधव)
..................................................................