अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर फौजदारी गुन्हे, मुख्याधिकाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:11 IST2020-12-07T14:04:17+5:302020-12-07T14:11:06+5:30
Muncipal Corporation, karad, water, sataranews कऱ्हाड शहरात चोरून नळ कनेक्शन घेतल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत नळ कनेक्शनच्या माध्यमातून पाणी चोरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही चोरी रोखण्यासाठी नगरपालिकेकडून लवकरच शहरातील प्रत्येक नळ कनेक्शनची तपासणी करण्यात येणार आहे.

अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर फौजदारी गुन्हे, मुख्याधिकाऱ्यांचा इशारा
कऱ्हाड : शहरात चोरून नळ कनेक्शन घेतल्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत नळ कनेक्शनच्या माध्यमातून पाणी चोरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही चोरी रोखण्यासाठी नगरपालिकेकडून लवकरच शहरातील प्रत्येक नळ कनेक्शनची तपासणी करण्यात येणार आहे.
या तपासणीत अनधिकृत नळ कनेक्शनद्वारे पाणी वापरत असल्याचे आढळल्यास अशा नळ कनेक्शनधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिला आहे.
अनधिकृतपणे चोरून नळ कनेक्शनची जोडणी करून शहरातील अनेक भागांत काही नागरिकांकडून पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गंभीर दखल घेतली आहे.
लवकरच शहरातील नळ कनेक्शनची तपासणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तपासणीदरम्यान चोरटे नळ कनेक्शन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा डाके यांनी इशारा दिला आहे.
तसेच, जर शहरातील कोणत्याही भागात अशा प्रकारे अनधिकृतपणे कोणी चोरून पाणी वापरत असल्यास नागरिकांनी ते पालिकेच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
ही कठोर कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत नळ कनेक्शनधारकांनी स्वतःहून ३१ डिसेंबरपर्यंत आपले कनेक्शन नियमित करण्यास इच्छुक असल्याचे कळववावे, अशी नळकनेक्शन पालिका संबंधितांकडून दंड भरून घेऊन नियमित करून देईल. मात्र, त्यानंतरही कोठेही पाणी चोरी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी डाके यांनी दिला आहे.