उदयनराजे, शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल; 'जमावबंदी'चा भंग करून आले होते आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 17:01 IST2018-10-23T13:50:01+5:302018-10-23T17:01:57+5:30
शाहूपुरी पोलीस ठाण्यात उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 70 जणांवर जमावबंदी आदेशाच्या भंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

उदयनराजे, शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल; 'जमावबंदी'चा भंग करून आले होते आमनेसामने
सातारा : जुना मोटार स्टँड परिसरातील देशी दारू दुकानावर सोमवारी (22ऑक्टोबर) पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमने-सामने आले. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 70 जणांवर जमावबंदी आदेशाच्या भंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक व नगरसेवक रवी ढोणे यांच्या कुटुंबीयांचे जुना मोटार स्टँड परिसरात देशी दारूचे दुकान आहे. या दुकानाची जागा उदयनराजे समर्थक समीर खुटाळे यांच्या मालकीची आहे. याबाबत न्यायालयात वाद सुरू आहे.
दारू दुकानावर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक सोमवारी दुपारी दाखल झाले. दरम्यान, उदयनराजे भोसले काही कार्यकर्त्यांसह दुकानासमोर आले. काही वेळातच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही दाखल झाले. दोन्ही राजे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण निवळले.
याप्रकरणी पोलीस नाईक धनंजय कुंभार यांनी फिर्याद दिली असून उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, समीर माने, किशोर शिंदे, संदीप शिंदे, राहुल गायकवाड, समीर खुटाळे, सूरज अवघडे, केदार राजेशिर्के व इतर ७० ते ७५ जणांवर जमावबंदी व शस्त्रबंदीचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे तपास करीत आहेत.