कास स्वच्छतेकडे नगरसेवकांचीच पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 13:59 IST2019-12-13T13:54:09+5:302019-12-13T13:59:24+5:30
सातारा पालिका व प्रथमेश फाउंडेशच्या माध्यमातून कास तलाव परिसरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेकडे जवळपास सर्वच नगरसेवकांनी पाठ फिरविल्याने मोहिमेचा फज्जा उडाला. केवळ आरोग्य विभागाच्या चाळीस कर्मचाऱ्यांनी कास तलाव परिसरात श्रमदान करून सुमारे एक टन कचरा गोळा केला.

कास स्वच्छतेकडे नगरसेवकांचीच पाठ
सातारा : सातारा पालिका व प्रथमेश फाउंडेशच्या माध्यमातून कास तलाव परिसरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेकडे जवळपास सर्वच नगरसेवकांनी पाठ फिरविल्याने मोहिमेचा फज्जा उडाला. केवळ आरोग्य विभागाच्या चाळीस कर्मचाऱ्यांनी कास तलाव परिसरात श्रमदान करून सुमारे एक टन कचरा गोळा केला.
कास पठार व परिसराला शेकडो पर्यटक भेट देतात. या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अस्वच्छतेमुळे पर्यावणाला धोका पोहोचत असताना हा परिसर स्वच्छ व सुंदर रहावा, यासाठी सातारा पालिका व प्रथमेश फाउंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची कल्पना देऊनही सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजप नरसेवकांनी श्रमदानात सहभाग न घेतल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला.
अखेर आरोग्य विभागाच्या चाळीस कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी श्रमदान करण्यात आले. सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत दारूच्या बाटल्या, काचा, पत्रावळ्या, ग्लास, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या असा सुमारे एक टन कचरा संकलित करून त्याची सोनगाव डेपोत विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी आरोग्य सभापती विशाल जाधव, स्वीकृत नगरसेवक अविनाश कदम, राजेंद्र कायगुडे, गणेश टोपे, सागर बडेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, श्रमदानानंतर सर्वांनी सामुदायिक भोजनाचा आनंदही लुटला.