CoronaVirus Lockdown : बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:13 IST2020-04-02T16:11:23+5:302020-04-02T16:13:08+5:30
बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय प्रसिद्ध आहे. यावरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे, तसेच दररोजची देखभालही परवडत नसल्याने बामणोली परिसरातील बोल मालकांनी बोटी जमिनीवर काढल्या आहेत.

CoronaVirus Lockdown : बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या
बामणोली : बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय प्रसिद्ध आहे. यावरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे, तसेच दररोजची देखभालही परवडत नसल्याने बामणोली परिसरातील बोल मालकांनी बोटी जमिनीवर काढल्या आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात इटली, जपान, स्पेन येथील पर्यटकांनी या भागाला भेट देऊन ह्यअमेझिंग प्लेसह्ण असे येथील निसर्गसौंदर्याचे वर्णन केले होते. येथील हिरवागार निसर्ग व शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य अनेकांना मोहीत करत असते. जलसफारीसाठी तापोळा, बामणोलीला पाच बोट क्लब आहेत. त्यांच्या मोटर लाँच, स्पीड बोट, पेंडल बोट, रोर्इंग बोट तसेच स्कूटर यांची संख्या हजारोंच्या घरात आहेत.
सध्या या लाँचेसना एकही पर्यटक व प्रवासी मिळत नसल्याने पंधरा दिवसांपासून या बोटी जाग्यावरच पाण्यात बांधलेल्या आहेत. परंतु या बोट मालकांना दररोज नदीकिनारी जाऊन बोटीत येणारे पाणी काढावे लागत आहे. तसेच पाण्याची पातळी सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे दररोज तीन ते चार फुटांनी घटत आहे. त्यामुळे दररोज सकाळी नदी बाहेर कोरड्या जागेत असणारी बोट पाण्यात ढकलावी लागत आहे. त्यामुळे दररोज ही अनावश्यक धडपड करावी लागत आहे. अनेक बोट मालकांनी आपल्या बोटी आतापासूनच पाण्यातून बाहेर काढून कोरड्या पात्रात ओढून ठेवण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यातच नदीपात्र कोरडे पडले होते. त्यामुळे बोटचालकांचा चार महिन्यांचा व्यवसाय बुडाला होता. परंतु यावर्षी पाणी जास्त असूनही केवळ कोरोना संकटामुळे पर्यटक नाहीत. धंदा नाही, त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज व कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? या चिंतेत बोटमालक आहेत. त्यामुळे बोटी बाहेर काढून ठेवलेल्याच बऱ्या या निर्णयापर्यंत अनेक बोट मालक आले आहेत.
गतवर्षी नदीपात्र कोरडे पडले होते. यंदा नदीत पाणीही जास्त आहे. वासोट्यामुळे धंदाही चांगला होत होता. परंतु लॉकडाऊनमुळे पंधरा दिवस दररोज नदीकाठी जाऊन बोटीतील पाणी काढणे व लाँच पाण्यात ढकलणे एवढेच काम करावे लागत आहे. कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? हाच प्रश्न आहे.
- आनंदा भोसले,
बोट मालक, मुनावळे, ता. जावळी