चाफळला विनाकारण फिरणाऱ्या दोनशे जणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:41+5:302021-06-16T04:50:41+5:30
चाफळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेले कडक निर्बंध शिथिल करत अनलाॅक करताच चाफळ येथे सोमवारी मोठी गर्दी ...

चाफळला विनाकारण फिरणाऱ्या दोनशे जणांची कोरोना चाचणी
चाफळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेले कडक निर्बंध शिथिल करत अनलाॅक करताच चाफळ येथे सोमवारी मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी आटोक्यात यावी यासह विनाकारण फिरणारांना चाप बसावा यासाठी सोमवारी चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना ग्रामसमिती व पोलीस दूरक्षेत्र चाफळ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त कारवाई करत दोनशे जणांना पकडून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात सर्वजण निगेटिव्ह आले.
प्रशासकीय यंत्रणेने चाफळ विभागात वेळोवेळी कडक निर्बंध घातल्याने विभागाची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. चाफळ भागात आजपर्यंत फक्त तीन कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. ही रुग्णसंख्या आटोक्यात राहावी यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. चाफळसह परिसरात शनिवार, रविवारच्या कडक लॉकडाऊननंतर मोठी गर्दी वाढू लागली होती. ही गर्दी आटोक्यात आणण्यासह मोकाट फिरणाऱ्यांना चाप बसावा यासाठी चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना ग्रामसमिती व पोलीस दूरक्षेत्र चाफळ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त कारवाई राबविण्यात आली. या वेळी पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या दोनशे जणांना पकडून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात सर्वजण निगेटिव्ह आढळून आले. या कारवाईमुळे मोकाट फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई सुरू असल्याचे समजताच दुपारनंतर गर्दी आपोआपच कमी झाली होती.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस नाईक अमृत आळंदे, सुशांत शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे, आरोग्यसेवक दत्तात्रय गायकवाड, राजेंद्र राऊत, सुरेश माने यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व कोरोना ग्राम समितीचे सदस्यांनी सहभाग घेतला होता.