कऱ्हाडात सर्वच रिक्षा चालकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:21+5:302021-06-22T04:26:21+5:30
प्रवाशांची वाहतूक करणारे रिक्षा चालक कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. प्रशासनाच्या ...

कऱ्हाडात सर्वच रिक्षा चालकांची कोरोना चाचणी
प्रवाशांची वाहतूक करणारे रिक्षा चालक कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. प्रशासनाच्या सूचनेनुसार वाहतूक पोलिसांनी शहरातील सर्व रिक्षा चालकांची कोरोना चाचणी करण्यासाठीची मोहीम सोमवारी बसस्थानकानजीक असणाऱ्या वाहतूक शाखेत राबविली. या मोहिमेत दुपारपर्यंत १८६ चालकांची ‘अँटिजेन टेस्ट’ करण्यात आली. त्यामध्ये सर्व चालकांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक सरोजिनी पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, तलाठी संजय जंगम, रिक्षा संघटनेचे अशोकराव पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने गत महिन्यात प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधिक्षक रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर शहरातील प्रशासकीय कार्यालये, बसस्थानक, पोलीस स्टेशन याठिकाणी कार्यरत तसेच कामानिमित्त येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पालिका, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती आदी ठिकाणीही चाचणी करण्यात आली. त्यानंतर आता रिक्षा चालकांची सरसकट चाचणी करण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष चाचण्या करण्यात आल्या. या मोहिमेला रिक्षा चालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फोटो : २१केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाडच्या वाहतूक शाखेत सोमवारी रिक्षा चालकांची कोरोना चाचणी करण्यात आली.