कोरोना कमी... निर्बंध शिथील... बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:20+5:302021-06-22T04:26:20+5:30
सातारा : तब्बल दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संचारबंदीचे निर्बंध शिथील झाले अन् साताऱ्याची बाजारपेठ पुन्हा एकदा नागरिकांच्या गर्दीने गजबजून ...

कोरोना कमी... निर्बंध शिथील... बाजारात गर्दी
सातारा : तब्बल दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संचारबंदीचे निर्बंध शिथील झाले अन् साताऱ्याची बाजारपेठ पुन्हा एकदा नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेली. दुकाने खुली झाल्याने व्यापारी, विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, मात्र नागरिकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून खरेदीलाच प्राधान्य दिले.
राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली. प्रारंभी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर संचारबंदीचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात आले. सोमवारपासून शहरातील सर्व आस्थापना सुरू झाल्या. मात्र, दुकानदार व व्यापाऱ्यांना सकाळी ९ ते ४ असे वेळेचे बंधनही घालण्यात आले आहे.
तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यासह साताऱ्याची बाजारपेठ सोमवारी खुली झाल्याने व्यापारी, विक्रेते व दुकानदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. किराणा व कपड्यांची दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली होती. सराफा दुकानातही ग्राहकांची रेलचेल दिसून आली. भाजी व फळ विक्रेत्यांपुढे ग्राहकांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या. शहरातील राजपथ, मोती चौक, खण आळी, पाचशे एक पाटी, राजवाडा, तहसील कार्यालयाचा परिसर नागरिकांनी गजबजून गेला. फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, मास्कचा वापर करा, असे प्रशासन ठणकावून सांगत असतानाही बहुतांश नागरिक कोरोना आता संपला या अविर्भावात विनामास्क वावरताना दिसून आले.
(चौकट)
कोरोना कमी झालाय... गेला नाही
साताऱ्याच्या बाजारपेठेत सोमवारी नागरिकांची प्रचंड गर्दी लोटली. ‘सर्व काही आजच मिळणार आहे, उद्या काहीच मिळणार नाही’ या अविर्भावात नागरिकांनी भरभरून खरेदी केली. कोरोनाबाधितांची संख्या केवळ कमी झालेली आहे, अजून कोरोना गेलेला नाही, या गोष्टीचाही नागरिकांना विसर पडल्याचे दिसून आले.
(चौकट)
फिजिकल डिस्टन्सचा फज्जा
बाजारपेठ खुली झाल्याने सोमवारी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने बाजारपेठेत हजेरी लावली. छत्र्या, रेनकोट, प्लास्टिक कागद, चपला यासह किराणा खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिले. मात्र, फिजिकल डिस्टन्सचे बहुतांश दुकानदार व नागरिकांकडून पालन करण्यात आले नाही. हा निर्धास्तपणा कोरोना वाढीसाठी कारणीभूूत ठरू शकतो.
(पॉईंटर)
- व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
- सराफा दुकानातही ग्राहकांची रेलचेल सुरू
- काही दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सचे पालन केले गेले
- मास्क, सॅनिटायझरशिवाय दुकानात प्रवेश दिला जात नव्हता
- किराणा दुकानात मात्र प्रचंड गर्दी पाहायला मिळाली
- काही नागरिक विनामास्क फिरतानाही दिसून आले
फोटो : २१ जावेद खान ०१/०२/०३
संचारबंदीचे निर्बंध शिथील झाल्याने साताऱ्याची बाजारपेठ सोमवारी खुली झाली. शहराचे हृदय म्हणून ओळखला जाणारा राजपथ गर्दीने असा गजबजून गेला होता. (छाया : जावेद खान)