शिरवळ : शिरवळ पोलिसांनी केवळ दोन तासांमध्ये तब्बल १२३ विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. शिरवळ पोलिसांनी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने मोहिम राबवित विनाकारण फिरताना आढळल्यास त्वरीत आरटी-पीसीआर व अँन्टिजन टेस्ट केली. कोरोनाबाधित आढळल्यास नागरिकांची रवानगी थेट रुग्णालयात व कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात येत आहे.यामध्ये शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव, पोलीस हवालदार प्रकाश फरांदे व शिरवळचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी जबरदस्त धक्कातंत्र अवलंबला. केवळ दोन तासांमध्ये तब्बल १२३ विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी करीत शिरवळसह परिसरात खळबळ उडवून दिली आहे.शिरवळ येथील गावामध्ये प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर शिरवळ पोलीसचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सतिशकुमार सरोदे, डॉ. प्रितम कांबळे-सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शिरवळ व परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम राबविली.
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची थेट जागेवरच कोरोनासाठी आवश्यक असणारी तपासणी करण्यास सुरूवात केली. यावेळी तपासणी करण्यास नकार देणाऱ्या व वाद घालणाऱ्या नागरिकांना शिरवळ पोलिसांनी कायद्याचा चांगलाच हिसका दाखविल्याने विनाकारण फिरणारे नागरिकांना चांगलीच जरब बसली.या मोहिमेचे जोरदार स्वागत शिरवळकर नागरिकांमधून होत असून या कारवाईमध्ये सातत्य राहिल्यास लवकरात लवकर शिरवळ हे कोरोनामुक्त होण्यास मदत होईल असा विश्वास शिरवळकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी शिरवळ पोलिसांकडून करण्यात येत आहे. शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना जरब बसत कायद्याचा धाक निर्माण व्हावा याकरीता त्वरीत कोरोना तपासणी मोहिम शिरवळ पोलीसांमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी केले आहे.