फलटण : ‘पिण्याचे पाणी, चारा टंचाई आणि रोजगाराची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी तालुक्याच्या कायम दुष्काळी पट्ट्यात शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून प्रभावी काम करण्याचा निर्धार शासन, प्रशासन आणि सर्वसामान्यांनी घेतला असल्याने या तालुक्यात ‘जलयुक्त शिवार’ अभियान निश्चित यशस्वी होईल,’ असा विश्वास प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी व्यक्त केला. दरम्यान, या अभियानांतर्गत सहा गावात काम सुरु झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाने पारित केलेल्या शासन निर्णयानुसार सर्वांसाठी पाणीटंचाई मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियानासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.प्रांताधिकारी जाधव म्हणाले, ‘अभियानांतर्गत नियोजित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाणीटंचाई जाणवणाऱ्या भागातील कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत फलटण तालुक्यात वडगाव, पिंप्रद आणि पिराचीवाडी येथे साठव बंधारे, मिरढे, टाकूबाईचीवाडी येथे सिमेंट नालाबांधांचे काम सुरू करण्यात आले आहे.’ ‘जलयुक्त शिवार’ अभियान प्रभावीरीतीने राबविण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, या समितीमध्ये फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सहसदस्य असून, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, उपअभियंता जलसंपदा, उपअभियंता लघु सिंचन, उपअभियंता जिल्हा परिषद सिंचन हे अधिकारी आहेत. (प्रतिनिधी) फलटण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये अस्तित्वातील मंजूर कामांची संख्या ६३, नव्याने हाती घ्यावयाची कामे ११, ८२६ आणि अस्तित्वातील कामांची दुरुस्ती, बळकटीकरण आणि गाळ काढणे कामांची संख्या ५५५ आहे.-राजेंद्रकुमार जाधव, प्रांताधिकारी
सहा गावात अभियानाचे काम सुरू
By admin | Updated: January 5, 2015 00:39 IST