फलटणमध्ये संविधान समर्थन मोर्चा दिल्ली घटनेचे पडसाद : शेकडो नागरिक सहभागी; महिलांचा मोठा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:57 IST2018-08-17T22:54:53+5:302018-08-17T22:57:22+5:30
जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी फलटण येथे संविधान समर्थन मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

फलटणमध्ये संविधान समर्थन मोर्चा दिल्ली घटनेचे पडसाद : शेकडो नागरिक सहभागी; महिलांचा मोठा सहभाग
फलटण : जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी फलटण येथे संविधान समर्थन मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
या मोर्चाला मंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनपासून सुरुवात झाली. जुनी चावडी, पंचशील चौक, बारामती चौक, नाना पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौकमार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला.
यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. अशा संविधानाच्या प्रती जाळून असे मनुवादी कृत्य करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. येणारा काळ हा खूप गंभीर आहे. या काळास सामोरे जाण्यासाठी समक्षपणे उभे राहण्याची गरज आहे.’
बसपाचे महाराष्ट्र सचिव काळुराम चौधरी म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट घेऊन संविधान तयार केले. हे संविधान जाळणाºया मनुवाद्यांना धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही.’ त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने तहसीलदार विजय पाटील व फलटण शहर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. फलटण शहरात शांततेत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिला व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन