काँग्रेस नेत्यांकडून स्वतंत्र पॅनेल तयार...

By Admin | Updated: April 27, 2015 00:17 IST2015-04-26T22:51:37+5:302015-04-27T00:17:38+5:30

आज घोषणा : पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत व्यूहरचना; समदु:खी नेते, इच्छुक एकत्र

Congress leaders create separate panel ... | काँग्रेस नेत्यांकडून स्वतंत्र पॅनेल तयार...

काँग्रेस नेत्यांकडून स्वतंत्र पॅनेल तयार...

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दुखावलेल्या काँग्रेस नेत्यांनी विरोधी पॅनेल उभारण्याची तयारी केली आहे. मोहनराव कदम यांनी यासंदर्भातील चाचपणी करून १९ उमेदवारांचे पॅनेल तयार केले आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत सोमवारी, २७ एप्रिल रोजी याची घोषणा केली जाणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आ. जयंत पाटील यांनी मोठी राजकीय खेळी करीत काँग्रेसमध्ये फूट पाडली. भाजपचे खासदार संजय पाटील, जयंत पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांना आपल्याकडे खेचले. त्यामुळे काँग्रेस सध्या या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. शनिवारी सांगलीत काँग्रेसने जिल्ह्यातील नाराज नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, दिगंबर जाधव आदी नेते उपस्थित होते. अजितराव घोरपडेही या पॅनेलच्या मदतीला धावणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र त्यांनी या गोष्टीचा रविवारी इन्कार केला.
गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी शेतकरी सहकारी पॅनेलशिवाय उरलेल्या उमेदवारांमधून १९ उमेदवारांची निवड केली आहे. त्यामुळे १९ जणांचे स्वतंत्र पॅनेल करून काँग्रेस नेते मैदानात उतरणार आहेत. शेवटच्या टप्प्यात पतंगराव कदम यांनीही निवडणुकीत लक्ष घालण्याचे ठरविले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी ३३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिराळा सोसायटी गटातून माजी आमदार मानसिंगराव नाईक व वाळवा सोसायटी गटातून दिलीप तात्या पाटील यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १९ जागांसाठी ५३ जण रिंगणात आहेत. त्यामुळे १९ जागांसाठी आता काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल मैदानात उतरणार आहे. या पॅनेलमध्ये अन्यपक्षीय नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)


पॅनेलची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची घोषणा उद्या केली जाईल. अभद्र युतीमुळे आम्हाला सर्वच तालुक्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी या अभद्र युतीच्या विरोधात मतदान होऊन आम्हाला फायदा होईल.
- मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस



तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाला अपेक्षेपेक्षा चांगल्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यांना न्याय मिळण्याचा प्रश्नच नाही. मी जिल्हा बँकेत लक्ष घातलेले नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्न उद्भवत नाही. विरोधी पॅनेलच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही.
- अजितराव घोरपडे, माजी मंत्री


अनेक उमेदवारांची मनधरणी
पॅनेलची उभारणी करताना काही ठिकाणी काँग्रेस नेत्यांना उमेदवारांची मनधरणी करावी लागली. एकाच गटात दोन किंवा त्याहून अधिक उमेदवार असतील, त्याठिकाणी काँग्रेस नेत्यांनी उमेदवारांची समजूत काढली. जत, मिरज या सोसायटी गटाबरोबरच अन्य गटांतही अनेक ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार असल्याने उमेदवार निवडीवेळीही काँग्रेसची दमछाक झाली.

Web Title: Congress leaders create separate panel ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.