आचारसंहिता नियमांचे तंतोतंत पालन करावे
By Admin | Updated: September 15, 2014 23:24 IST2014-09-15T21:43:20+5:302014-09-15T23:24:58+5:30
सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

आचारसंहिता नियमांचे तंतोतंत पालन करावे
सिंधुदुर्गनगरी : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाची निवडणूक आचारसंहिता लागू केली असून निवडणूक घोषणेच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंत्री, राज्यमंत्री, उमेदवार, राजकीय पक्षांनी नवीन प्रकल्प, कार्यक्रम, कोणत्याही स्वरूपातील सवलती, वित्तीय अनुदान घोषित करणे, त्याविषयी अभिवचन देणे किंवा उद्घाटन, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते आदी बांधण्याचे वचन देणे, मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविणे आदी गोष्टीस प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात किंवा मंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात योजनेचा निर्देश करण्यात आला होता. याप्रकारचे दिखाऊ समारंभ कटाक्षाने टाळण्यात यावेत. अशा कल्याणकारी उपाययोजना किंवा साह्यकारी व पुनर्वसनाची कामे ही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदारांचे मत अनुकूल करण्याच्या हेतूने प्रभाव पाडण्यासाठी शासनाद्वारे हाती घेण्यात येत आहेत व त्या गोष्टीचा इतर पक्षाच्या निवडणूक भवितव्यावर प्रतिकूल परिणाम होईल, असा ग्रह निर्माण होण्यास वाव देण्यात येऊ नये.
तरी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ वेळी नवीन प्रकल्प किंवा कार्यक्रम किंवा कोणत्याही स्वरूपातील सवलती किंवा वित्तीय अनुदान घोषित करणे किंवा त्याविषयी अभिवचने देणे आदी गोष्टींच्या निर्बंधांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ई. रविंद्रन यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)