लोकांची शिधापुरवठा बंद केल्याची तर दुकानदाराची मारहाण केल्याची तक्रार, कराड तालुक्यातील साळशिरंबे येथील प्रकार
By प्रमोद सुकरे | Updated: December 13, 2022 11:57 IST2022-12-13T11:57:09+5:302022-12-13T11:57:30+5:30
प्रमोद सुकरे कराड : अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा अशी योजना काही महिन्यापूर्वी शासनाने सुरू केली होती. त्यात सदन असणाऱ्या ...

लोकांची शिधापुरवठा बंद केल्याची तर दुकानदाराची मारहाण केल्याची तक्रार, कराड तालुक्यातील साळशिरंबे येथील प्रकार
प्रमोद सुकरे
कराड : अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा अशी योजना काही महिन्यापूर्वी शासनाने सुरू केली होती. त्यात सदन असणाऱ्या तालुक्यातील सुमारे १ हजार १०० वर लोकांनी याचा लाभ सोडला आहे. पण साळशिरंबे येथील काही लोकांनी मात्र आम्हाला फसवून आमच्या अर्जावर सह्या घेतल्या आहेत. त्यामुळे आमचा शिधा बंद झाला असून हा आमच्यावर अन्याय आहे. तरी संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार कार्यालयाकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. तर शिधा का देत नाही म्हणून काहींनी मारहाण केल्याची तक्रार दुकानदाराने दिली आहे. त्यामुळे या प्रकाराची नेमकी सत्यता तपासण्याची गरज आहे.
काही लोकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या गावात विकास सेवा सोसायटी व अन्य १ दुकानातून स्वस्त धान्य दुकानमार्फत कार्डधारकांना दर महिन्याला अन्नधान्य पुरवले जाते. मात्र या दुकानदारांनी 'अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडा' या योजनेच्या अर्जावर आम्ही राजकीय विरोधक असल्याने आमच्या फसवून सह्या घेतल्या आहेत .त्यामुळे आमचा शिधा बंद झाला आहे.
आम्ही गरीब व गरजू कुटुंबातील आहोत. त्यामुळे आमच्यावर हा अन्याय होत आहे. म्हणून आम्ही तालुका पुरवठा विभागाशी संपर्क साधला मात्र तेथेही उडवा-उडुची उत्तरे मिळाली. म्हणून आज एकत्रित येऊन हे निवेदन देत आहोत. तरी दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदनावर निवास यादव,शांताबाई पाटील, कमल यादव यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
मारहाण केल्याचा दुकानदाराचा तक्रार अर्ज
दरम्यान रेशनिंग न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचा तक्रार अर्ज विकास सेवा सोसायटीच्या दुकानदाराने कराड पोलीसांत दिला आहे. त्याची प्रत तहसीलदार कराड यांच्याकडेही दिली आहे. तक्रार अर्जात म्हटले आहे की, अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनेची माहिती ग्रामसभेत देण्यात आली होती. ग्रामसभेत ठरले प्रमाणे लोकांना पूर्ण माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेतले आहेत. मात्र तरीदेखील अनिकेत बाबासो यादव व बाबासो शंकर यादव यांनी २८ नोव्हेंबर रोजी सोसायटीमध्ये येवून मला रेशनिंग का देत नाही असे म्हणून मला दमदाटी देत मारहाण केली. तसेच सध्या ते माझी समाजमाध्यमातून बदनामी करीत आहेत. त्यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे असेही तक्रारीत म्हटले आहे.
सदन लोकांनी धान्याचा लाभ सोडावा म्हणजे गरजूंना त्याचा लाभ मिळेल असा योजनेचा हेतू आहे. तसेच लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देवूनच त्यांचे अर्ज भरुन घेतले आहेत. त्या अर्जावर अर्जदाराची सही असते. त्यामुळे कोणावर जाणिवपूर्वक अन्याय करण्याचा प्रश्नच नाही. तरीही चुकुन कोणावर अन्याय झाला असेल तर ते तपासून पाहू - महादेव आष्टेकर, पुरवठा निरिक्षक, कराड