बोगस अभियंते शोधण्यासाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:06+5:302021-06-16T04:51:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा परिषदेच्या सलग दुसऱ्या सर्वसाधारण सभेत अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा जोरात गाजला. सदस्यांनी बोगस ...

Committee to find bogus engineers | बोगस अभियंते शोधण्यासाठी समिती

बोगस अभियंते शोधण्यासाठी समिती

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा परिषदेच्या सलग दुसऱ्या सर्वसाधारण सभेत अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा जोरात गाजला. सदस्यांनी बोगस अभियंते सापडले का? चौकशी कुठपर्यंत आली, असा सवाल केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे सादर केलेले अभियंते शोधण्यासाठी समिती तयार केली आहे. १५ दिवसांत अहवाल देऊ, असे आश्वासन दिले.

दरम्यान, याच सभेत सातारा मेडिकल कॉलेजला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा व जिल्हा शासकीय रुग्णालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा उभा करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ आदी उपस्थित होते.

सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच सदस्य भीमराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली. ही मागणी सभेच्या शेवटपर्यंत अनेक सदस्यांनी लावून धरली. यावर अध्यक्षांनी फोटो लावण्यास हरकत नाही. पण, याबाबत एक धोरण ठरवू. त्यानंतर तैलचित्रांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगून लवकर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तर सभेच्या पहिल्या टप्प्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा सांगितला. यानंतर सदस्य दीपक पवार यांनी जिल्हा परिषदेतील अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा उपस्थित केला. सदस्य अरुण गोरे यांनीही सहभागी होत जोरदार आवाज उठविला.

दीपक पवार यांनी जिल्हा परिषदेतील बोगस अभियंते सापडले का, त्यांचे काय झाले, तीन महिन्यांत काय चौकशी झाली, असा रोखठोक सवाल केला. यावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभय पेशवे यांनी माहिती दिली. एक समिती तयार करुन चौकशी करणार आहे, असेही सभागृहात स्पष्ट केले. यावर सदस्य अरुण गोरे यांनी चौकशी समिती सर्वांना विचारात घेऊन तयार करा. पाठीमागेच या गोष्टी झाल्या असत्या तर पुन्हा हा विषय समोर आला नसता, असे स्पष्टपणे सांगितले. तर दीपक पवार यांनी या समितीसमोर माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष शेंडे यांना माहिती देण्यास बोलवा, असे सुचविले. अध्यक्ष उदय कबुले यांनीही कोणी चुकीचे कागदपत्रे दिली असतील. शासनाची फसवणूक व तोटा केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, असे निक्षून सांगितले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी अभियंत्यांची शैक्षणिक कागदपत्रे तपासणीसाठी समिती स्थापन केली आहे. समितीसाठी नावे सुचवा. १५ दिवसांत तपासणी करुन अहवाल देऊ, अशी ठामपणे ग्वाही दिली. त्यामुळे तीन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या विषयांवर खऱ्या अर्थाने प्रकाशझोत पडणार आहे.

चौकट :

चौकट :

समाजकल्याणबद्दल नाराजी...

सभेत समाजकल्याण विभागाबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. तसेच समाजकल्याण अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. सदस्य दीपक पवार यांनी समाजकल्याण विभागातील दिव्यांगांचा टेबल असणाऱ्या मॅडमना हाकला. दिव्यांगांशी उध्दट वागतात, असे स्पष्टपणे सांगितले. तर सभा संपल्यानंतर अध्यक्ष उदय कबुले यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्याच्या तक्रारी येत आहेत. तुम्हाला काही अडचण असेल तर वरिष्ठांना सांगा. जिल्हा परिषदेचा नावलौकिक आहे. त्याला गालबोट लावण्याचे काम होऊ नये. आपल्या स्वभावात बदल करा, असे स्पष्टपणे सांगितले.

फोटो दि.१५सातारा झेडपी नावाने...

फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. या वेळी विविध विषयांवरून सभा गाजली. (छाया : नितीन काळेल)

.......................................................................

Web Title: Committee to find bogus engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.