मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कुटुंबियांसह कण्हेरखेड गावास दिली भेट, साधेपणा पाहून ग्रामस्थ भावनाविवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:08 IST2025-01-28T12:06:42+5:302025-01-28T12:08:13+5:30
जमिनीवर डोके टेकवत कण्हेरखेडच्या भूमीला अभिवादन केले

मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कुटुंबियांसह कण्हेरखेड गावास दिली भेट, साधेपणा पाहून ग्रामस्थ भावनाविवश
कोरेगाव : कण्हेरखेडच्या पवित्र मातीने भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याची ताकद दिली. श्रीमंत महादजी शिंदे हे या पवित्र भूमीतील वीर योद्धा होते. आज या पवित्र मातीला वंदन करताना आनंद होत आहे. मी कोणी राजकीय नेता अथवा केंद्रीय मंत्री म्हणून या गावात आलो नाही, तर या कुटुंबातील प्रमुख म्हणून आलो आहे. जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत कण्हेरखेडच्या विकासामध्ये योगदान देणार असून, शिंदे मंडळींबरोबर कायम राहणार आहे, असा शब्द केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला.
मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून, सोमवारी सायंकाळी पाच वाजता त्यांनी पत्नी प्रियदर्शनीराजे आणि पुत्र आर्यमानराजे यांच्या समवेत कण्हेरखेड गावास भेट दिली. गावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपले पिताश्री माधवराव शिंदे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर जमिनीवर डोके टेकवत कण्हेरखेडच्या भूमीला अभिवादन केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, फलटणच्या श्रीमंत महाराजा महादजी शिंदे प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन शिंदे आदी मान्यवर आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी कण्हेरखेड गावातील सर्व मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतले. तसेच नगर प्रदक्षिणा घातली. राजवाड्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांसह शिंदे कुटुंबीयांशी संवाद साधला. पाच ते सहा वर्षातून मी कण्हेरखेडला येतो. या गावचा मी सुपुत्र आहे. या गावच्या विकासामध्ये मी आजवर योगदान दिले आहे, भविष्यात देखील देणार आहे. गेल्यावेळी जेव्हा आलो, त्यावेळी पाणी योजनेचा विषय ग्रामस्थांनी उपस्थित केला होता, तो त्याचवेळी मार्गी लावला आहे. यापुढेही विकासात योगदान देत राहू.
शिंदे कुटुंबीयांसोबत घेतले भोजन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते श्रीमंत महादजी शिंदे यांच्यापर्यंतच्या इतिहासाला त्यांनी यावेळी उजाळा दिला. तसेच, सहकुटुंब दुष्यंतराजे शिंदे फाकडे यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.