नारळ विक्रेत्यांना सुगीचे दिवस
By Admin | Updated: November 24, 2014 23:14 IST2014-11-24T21:19:09+5:302014-11-24T23:14:13+5:30
जिल्ह्यातील यात्रांना प्रारंभ : बाजारपेठेत वाढली मागणी

नारळ विक्रेत्यांना सुगीचे दिवस
सातारा : कुठलंही शुभकार्य नारळाशिवाय पार पडत नाही. वर्षभर मोठा खप असणाऱ्या या फळाला गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मागणी वाढल्याने नारळ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
सध्या यात्रेचा हंगाम धडाक्यात सुरु झाल्याने नारळाला आणखी मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ८00 शेकडा दराने विकले जाणारे नारळ आता १000 रुपये शेकडा या दराच्या घरात गेले आहेत. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुक याच वर्षात आल्याने नारळाचा विक्रमी खप झाला आहे. इतर फळांच्या तुलनेत ही विक्री खचितच मोठी ठरली आहे.
निवडणुकीआधी विकासकामांची उदघाटने तसेच भूमिपुजने झाली. यासाठी नारळ मोठ्या प्रमाणात खपला गेला. तुळशी बारसनंतर लग्नाचे मुहूर्तही सुरु झाले आहेत. लग्नाच्या विधीत नारळ आवश्यक असतो. त्यामुळे नारळाला मागणी वाढली आहे.
जिल्ह्यातील यात्रांचा हंंगामही सुरु झाला आहे. देवतांच्या यात्रांमध्ये होणाऱ्या छबिन्यात गुलाल आणि नारळाला मागणी असते.
सातारा येथील मंडई परिसरात केरळ राज्यातून तसेच आपल्या कोकणातूनही मोठ्या प्रमाणावर नारळ दाखल होत असतो. मात्र, वाहतूक खर्च लक्षात घेता कोकणातला नारळ विक्रीला परवडतो, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
सातारा येथील बाजारपेठेत दाखल झालेले नारळ बॅगांमध्ये भरताना व्यापाऱ्यांचे कर्मचारी.
निवडणुकीचा फायदा
तसं पाहिलं तर नारळ हे वर्षभर मागणी असणारे फळ. मात्र, यंदा लोकसभा, विधानसभा निवडणुका एकापाठोपाठ एक आल्याने नारळाला मागणी वाढली होती. निवडणुकीचा फायदा नारळ विक्रेत्यांना झाला होता. आता पुन्हा यात्रांमुळे मागणी वाढली आहे.
बाजारपेठेत नारळ मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. नारळाचा विविध कारणांसाठी वापर होत असल्याने या फळाला वर्षभर मागणी असते. नारळाचे दर वाढले तरी यात्रा काळात मागणी वाढतच असते.
- राजेंदसिंह रजपूत