मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान महिलेने दाखवले पोस्टर; फडणवीस म्हणाले, "ताईंना शांतपणे घेऊन या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:00 IST2025-01-03T15:05:29+5:302025-01-03T16:00:06+5:30

साताऱ्यातील एका कार्यक्रमात पोस्टर दाखवणाऱ्या महिलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटण्यासाठी बोलवून घेतले.

CM Devendra Fadnavis summoned a woman who displayed black flags at a program in Satara | मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान महिलेने दाखवले पोस्टर; फडणवीस म्हणाले, "ताईंना शांतपणे घेऊन या..."

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान महिलेने दाखवले पोस्टर; फडणवीस म्हणाले, "ताईंना शांतपणे घेऊन या..."

CM Devendra Fadnavis: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या नायगाव येथील त्यांच्या जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार छगन भुजबळ आदी उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान, एका महिलेने पोस्टर दाखवत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी या महिलेला बाजूला केलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित महिलेला भेटण्यासाठी बोलवल्याचे पाहयला मिळाले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या नायगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना नायगावच्या मातीने वेगळी ऊर्जा दिली आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी विषमता दूर करून समतेचे बीज पेरले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे भाषण करत असतानाच गर्दीत बसलेल्या एका महिलेने पोस्टर दाखवत आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष त्या महिलेकेडे गेले. यावेळी त्यांनी भाषण थांबवून गोंधळ घालणाऱ्या महिलेला भेटण्यासाठी बोलवून घेतलं.

"त्यांना दाखवू द्या. तुम्ही नंतर मला भेटा. त्यांना मला भेटायला घेऊन या. त्यांची काय व्यथा असेल ती ऐकून घेऊ," असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणास पुन्हा सुरुवात केली. मात्र त्यानंतरही महिलेचा गोंधळ सुरुच होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महिला पोलिसांना त्यांना घेऊन येण्यास सांगितले. "ताई त्यांना शांतपणे घेऊन या. कोणी काही करत नाही. त्यांची काही व्यथा आहे त्यामुळे त्यांना मागे घेऊन या. या आपल्या ताई आहेत त्यांचे काही निवेदन आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी भाषणास सुरुवात केली.

"रसातळाला गेलेल्या समाजामध्ये विषमता जाऊन समतेचे बिजारोपण होईल आणि समजातील स्त्रियांना अधिकार मिळावा याची मुहूर्तमेढ जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रोवली. सावित्रीबाईंच्या मागे जोतिराव फुले हे हिमालयाप्रमाणे उभे होते. ज्या प्रथा स्त्रियांना स्त्री म्हणून जगण्याकरता ज्या थांबवत होत्या त्या सर्व प्रथांविरोधात फुले दाम्पत्याने क्रांतीची ज्योत पेटवली. सावित्रीबाई फुले यांचं स्मारक लवकरात लवकर विस्तारित स्वरूपात तयार करायला राज्य सरकारचं प्राधान्य असेल. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असणार आहे," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title: CM Devendra Fadnavis summoned a woman who displayed black flags at a program in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.